एटीएम व्हॅनमधील 63 लाखांच्या कॅशच्या चोरीचा पर्दाफाश

आरोपी कर्मचार्‍यासह सहकार्‍याला चोरीच्या कॅशसहीत अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 एप्रिल 2026
मुंबई, – कांदिवलीतील एका एटीएम सेंटरमध्ये कॅश करण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यानेच एटीएम व्हॅनमधील सुमारे 63 लाखांची कॅश चोरी करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या सहा तासांत रायगड येथून पळून गेलेल्या कर्मचार्‍यासह गुन्ह्यांत कार पुरविणार्‍या सहकार्‍याला कांदिवली पोलिसांनी शिताफीने अटक केली. सुशांत दिपक कासारे आणि सुफियान रज्जबअली अशी या दोघांची नावे अअसून या दोघांकडून पोलिसांनी सुमारे 62 लाखांची कॅश आणि कार हस्तगत केली आहे. यातील सुशांतने ही चोरी केल्याचे तसेच सुफियानने त्याला कार दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सीएसएम इन्फोसिस्टम लिमिटेड नावाची एक खाजगी कंपनी असून या कंपनीला काही नामांकित बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये कॅश जमा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंगळवारी कंपनीचे काही कर्मचारी विविध एटीएम सेंटरमध्ये जमा करण्यासाठी गेले होते. रात्री पावणेदहा वाजता ते सर्वजण कांदिवलीतील एम. जी रोडवरील राजकिरण सहकारी सोसायटीमधील बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये आले होते. यावेळी कंपनीच्या कॅश वाहून नेणार्‍या कर्मचार्‍याने इतर गार्ड आणि कर्मचार्‍यांना गुंगारा देऊन व्हॅनमधील पैशांने भरलेल्या दोन बॅगा चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर इतर कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी कांदिवली पोलिसांना ही माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी सुशांत कासारे याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

या घटनेची अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर कांदिवली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरु आरोपी एका लाल रंगाच्या कारमधून पैशांच्या बॅगा घेऊन पळून जाताना सिला होता. तांत्रिक माहितीच्या आधारे तो रायगडच्या दिशेने पळून गेल्याचे उघडकीस येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे, पोलीस निरीक्षक शेखर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणित पारधी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मगर, नारायण खाडे, रविंद्र चव्हाण, मनोज गदळे,, प्रमोद दळवी, अशोक गोटमुकले, पोलीस हवालदार सुनिल शिंदे, योगेश हिरेमठ, पोलीस शिपाई सचिन कदम, महेश माळी, पोलीस उपनिरीक्षक अमीत धुमाळ (मालवणी पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील (एमएचबी पोलीस ठाणे), पोलीस शिपाई आदित्य राणे, आकाश पोळ आदीचे एक पथक रायगड येथे रवाना झाले होते.

या पथकाने कारचा पाठलाग करुन मुंबई-गोवा मार्गावरील पेण, बाभळी गावाजवळ सुशांत कासारेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 62 लाख 74 हजार 100 रुपयांची कॅश आणि गुन्ह्यांची कार जप्त केली. चौकशीत त्याला ती कार सूफियानने दिल्याचे उघडकीस आले, त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या सहा तासांत दोन्ही आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे व त्यांच्या टिमचे वरिष्ठांनी कौतुक केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page