अडीच कोटीच्या हेरॉईनसह 43 वर्षांच्या वेटरला अटक

मालाड येथे कांदिवली एएनसीची धडक कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2026
मुंबई, – सुमारे अडीच कोटीच्या हेरॉईनसह एका 43 वर्षांच्या आरोपीस कांदिवली युनिटच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मोहम्मद बेलाल मोहम्मद हासिम शेख असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 508 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद बेलालला गेल्या वर्षी अशाच एका ड्रग्जच्या गुन्ह्यांत अटक झाली होती, याच गुन्ह्यांत तो सध्या जामिनावर असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

मुंबई शहरात वाढत्या ड्रग्ज तस्करीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना काहीजण मालाड परिसरात हेरॉईनची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती कांदिवली युनिटला मिळाली होती. या माहितीची माहिती शहानिशा करण्यासाठी या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यानाजवळ मोहम्मद बेलाल हा आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 508 ग्रूम वजनाचे हेरॉईन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात याच हेरॉईनची किंमत 2 कोटी 54 लाख रुपये इतकी आहे. तपासात त्याने हेरॉईनची विक्रीसाठी तिथे आल्याची कबुली दिली. तो मूळचा बिहारचा रहिवाशी असून गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास होता. सध्या तो अंधेरीतील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर शुक्रवारी दुपारी त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

चौकशीत मोहम्मद बेलाल हा ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपी असून त्याला गेल्या वर्षी जानेवारी महिन्यांत ड्रग्जच्या अशाच एका गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला जामिन मिळाल्यानंतर तो पुन्हा ड्रग्ज तस्करी करु लागला होता. गेल्या वर्षभरात त्याने वेटरचे काम करताना अनेकदा ड्रग्जची विक्री केल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याला ते हेरॉईन कोणी दिले, तो तिथे कोणाला हेरॉईन देण्यासाठी आला होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page