सर्व्हर-वर्कस्टेशन मालाचे पेमेंट न करता ४६ लाखांची फसवणुक
खाजगी कंपनीच्या तीन संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ मार्च २०२४
मुंबई, – सर्व्हर आणि वर्कस्टेशन मालाची ऑर्डर देऊन मालाची परस्पर विक्री करुन एका खाजग कंपनीची सुमारे ४६ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार शीव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रदीप कचरु साळवे, कलावती सुनिल शिंदे आणि अंजली प्रदीप साळवे या तिघांविरुद्ध शीव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून ते तिघेही ब्रेनग्रीड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तेजस नवीनचंद्र शेठ हे शीव परिसरात राहत असून त्यांची संगणक सर्व्हर बनविण्याची एक खाजगी कंपनी आहे. या कंपनीत तेजस व त्यांची पत्नी शितल शेठ या मालक म्हणून काम पाहतात. कंपनीत सर्व्हर आणि वर्कस्टेशन बनविण्याचे काम चालत असून भारतासह विदेशात कंपनीच्या मालाची विक्री होते. त्यासाठी कंपनीने स्वतची वेबसाईट तयार केली असून या वेबसाईटच्या माध्यमातून ते त्यांच्या कंपनीसह मालाची जाहिरात करतात. डिसेंबर २०२२ रोजी ब्रेनग्रीड कंपनीचे प्रदीप साळवे याने त्यांच्या कंपनीचे सेल्समन सर्वेश विश्वकर्माला संपर्क साधून त्यांचा ईमेल आयडी घेतला होता. यावेळी त्याने त्याला काही संगणक सर्व्हर खरेदीसाठी ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर देताना सर्वेशने त्यांना कंपनीचे सर्व अटी-नियम सांगून आगाऊ पेमेंटविषयी सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेनंतर त्यांनी ८ लाख २१ हजाराची ऑर्डर देताना त्यांच्या कंपनीला एक धनादेशाद्वारे पेमेंट केले होते. त्यानंतर कंपनीने मालाची डिलीव्हरी प्रदीप साळवे यांना पाठवून दिली होती. माल मिळाल्याची पोचपावती नंतर त्याच्या कंपनीकडून देण्यात आली होती. पहिल्या व्यवहाराचे पेमेंट करुन त्यांनी कंपनीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यानंतर त्याने कंपनीकडे आणखीन काही मालाची ऑर्डर देताना त्यांना तीन धनादेश दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना सुमारे ४६ लाखांच्या मालाची डिलीव्हरी केली होती.
एप्रिल २०२३ रोजी सर्वेशने पेमेंटविषयी विचारणा केल्यानंतर त्याच्याकडे आणखीन काही दिवसांची मुदत मागवून घेतली होती. दिल्ली आयआयटीकडून त्याच्या कंपनीला अद्याप पेमेंट मिळाले नाही. पेमेंट मिळताच धनादेश बँकेत टाका अशी विनंती केली होती. काही दिवसांनी त्यांनी कंपनीने तळोजा येथे जमिन खरेदी केली असून त्यात कंपनीने गुंतवणुक केली आहे. त्यामुळे पेमेंट होण्यास उशीर होत असल्याचे सांगितले. मात्र धनादेशचा तीन महिन्यांचा कालावधी संपूनही त्यांनी मालाचे पेमेंट केले नव्हते. त्यापैकी दोन धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यामुळे सर्वेशने कॉल आणि मेलद्वारे त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कंपनीच्या तिन्ही संचालकाचा संपर्क होऊ शकला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी दिल्लीतील आयआयटी, सेंट्रल रिसर्च फॅसिलिटीकडे ब्रेनग्रीड कंपनीकडून त्यांना मालाची डिलीव्हरी झाली आहे का याबाबत विचारणा केली होती. मात्र त्यांना अशा प्रकारे कुठल्याही मालाची डिलीव्हरी झाली नसल्याचे समजले. कंपनीचे संचालक प्रदीप साळवे, कलावती शिंदे आणि अंजली साळवे यांनी तेजस शेठ यांच्या कंपनीकडून ४६ लाख ५९ हजार ८२० रुपयांचे माल घेऊन त्याची परस्पर विक्री करुन कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तेजस शेठ यांनी शीव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रदीप साळवे, सुनिल शिंदे आणि अंजली साळवे यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.