मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 मे 2026
मंबई, – डॉकयार्ड रोडवर कुख्यात गुंड आसिफ मोहम्मद इक्बाल शेख ऊर्फ आसिफ दाडी याच्या मुलावर बाईकवरुन आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबारात समीर आसिफ मोहम्मद शेख याच्या पायाला एक गोळी लागली असून त्याच्यावर जे. जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्याच्या जिवावर कुठलाही धोका नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या गोळीबारामागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही, मात्र आर्थिक वादातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पळून गेलेल्या शूटरचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहेत.
ही घटना मंगळवारी सायंकाळी डॉकयार्ड रोड, सायबान हॉटेजजवळच घडली. समीर हा कुख्यात गुंड आसिफ मोहम्मद ऊर्फ आसिफ दाडी याचा मुलगा आहे. डॉकयार्ड रोड परिसरात त्याचे स्वतचे एक कार्यालय आहे. मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजता तो हॉटेल सायबानजवळील त्याच्या ऑफिसच्या दिशेने जात होता. यावेळी बाईकवरुन आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केला. त्याने दोन गोळ्या फायर केल्या, त्यातील एक गोळी त्याच्या पायाला लागली होती.
गोळीबारानंतर मारेकरी बाईकवरुन पळून गेला होता. जखमी झालेला समीर हा जे. जे हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याने तिथे घडलेला प्रकार डॉक्टरांना सांगितला. गोळीबाराची माहिती मिळताच भायखळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी समीरची पोलिसांनी चौकशी केली, या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या हल्ल्यामागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही.
आर्थिक वादातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. समीरचे वडिल आसिफ दाडी हे कुख्यात गुंड असून त्यांचा एका संघटित टोळीशी संंबंध आहे. त्याच्यावर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती. समीरपूर्वी त्याच्यावरही अशाच प्रकारे गोळीबार झाला होता. दरम्यान या गोळीबाराच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत मारेकर्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम घेण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहे.