शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा घालणार्या मावस भावाला अटक
कुटुंबातील चार सदस्यांची 19 लाखांची फसवणुक केल्याचा आरोप
अरुण सावरटकर
16 मे 2026
मुंबई, – शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा घालणार्या आरोपी मावस भावाला अखेर नऊ महिन्यानंतर कांदिवली पोलिसांनी अटक केली. धवल विमलकांत कक्कड असे या आरोपी भावाचे नाव असून त्याच्यावर त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांची सुमारे 19 लाखांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. फसणवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत दिप आशर हा सहआरोपी असून या दोघांनीच संगनमत करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गुंजन हितेश कक्कड हे व्यवसायाने वकिल असून मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्ट्रिस करतात. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या मार्वे रोड परिसरात राहतात. धवल हा त्यांचा मावस भाऊ असून त्याचा शेअर ब्रोकरचा व्यवसाय आहे. त्याची डी/2 सिक्युरिटीज नावाची एक खाजगी कंपनी कांदिवलीतील रघुलिला मॉलमध्ये आहे. त्याने त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. तो त्यांचा मावस भाऊ असल्याने त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून विविध शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी 15 लाख 64 हजार रुपये दिले होते. तीन वर्षांपूर्वी त्याने त्यांना एका विमा कंपनीचे आयपीओ ओपन होणार असल्याने त्यात गुंतवणुक करा. या गुंतवणुकीवर इतर कंपन्यापेक्षा जास्त परतावा मिळेल असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी 8 लाख 55 हजाराची गुंतवणुक केली होती. ही गुंतवणुक त्यांनी स्वतसह त्यांचे आई-वडिल आणि भावाच्या वतीने केली होती.
शेअरमध्ये गुंतवणुक केल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे शेअरची मागणी केली होती, मात्र त्याने त्यांना शेअर दिले नाही. त्याने दिलेल्या डीमॅटच्या स्टेटमेंटमध्ये त्यांना संशय निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे शेअरसह पैशांची मागणी सुरु केली होती. सतत पैशांची मागणी होत असल्याने त्यांनी त्यांना पाच लाख रुपये परत केले. याच दरम्यान त्यांना धवलविरुद्ध जयपूरच्या संजय सर्किल पोलीस ठाण्यात एका गुंतवणुकदाराची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली होती. या गुन्ह्यांत अटकपूर्व जामिनासाठी त्याने जयपूरच्या उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. मात्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला होता.
या घटनेनंतर धवलने सर्वोच्च न्यायालयात क्रिमीनल अपील दाखल करुन तक्रारदार गुंतवणुकदाराशी समझौता करुन त्याला वीस लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा रद्द झाला होता. अशाच प्रकारे त्याने गुंजन कक्कड व त्यांच्या आई-वडिल आणि भावाची शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुक केली होती. त्यांच्याकडून 24 लाख 19 हजार रुपये शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी घेतले. या पैशांतून त्याने एका खाजगी कंनीचे ईटीएफचे 39 हजार युनिट खरेदी केले, मात्र पाच लाख रुपये परत करुन त्याने उर्वरित 19 लाख 19 हजार रुपयांचा अपहार करुन एकाच कुटुंबातील चौघांची फसवणुक केली होती. याकामी त्याला दिप आशर याने मदत केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच दिप आशर आणि धवल कक्कड या दोघांविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या धवल कक्कड याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.