मर्चंट नेव्हीच्या निवृत्त रेडिओ इंजिनिअरची 1.68 कोटीची फसवणुक
दहशतवाद्याला मनी लॉड्रिंगची कॅश पाठविल्याचा आरोप करुन गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 मे 2026
मुंबई, – मर्चंट नेव्हीच्या एका निवृत्त वयोवृद्ध रेडिओ इंजिनिअरची अज्ञात सायबर ठगांनी 1 कोटी 68 लाख रुपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार ग्रँटरोड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवा प्रसाद, निकिता पंत आणि नवजोत सिमी नाव सांगणार्या तोतया सीबीआय, ईडीच्या अधिकार्याविरुद्ध दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक करणे तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दहशतवाद्याकडे त्यांच्या नावाने डेबीट कार्ड सापले असून त्यांच्या खात्यातून दशहतवाद्याला मनी लॉड्रिंगचे पैसे पाठविण्यात आल्याचा आरोप करुन त्यांच्यावर लवकरच अटकेची धमकी देऊन ही फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
होमी दिनशा एडलकाका हे 80 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार ग्रँटरोड येथे राहतात. 30 वर्ष मर्चंट नेव्हीमध्ये रेडिओ इंजिनिअर म्हणून काम केल्यानंतर ते 2001 साली निवृत्त झाले होते. 23 मार्चला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना शिवा प्रसाद नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तो बंगलोरच्या अशोकनगर पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. सलाकत खान नावाच्या एका दशहतवाद्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे त्यांच्या नावाचा एक डेबीट कार्ड सापडले आहे. या खात्यात मनी लॉड्रिंगची मोठ्या प्रमाणात रक्कम ट्रान्स्फर झाली आहे. याच खात्यातून सलाकत खानला काही रक्कम ट्रान्स्फर झाले होते. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून त्याचा पुढील तपास दिल्लीतील स्पेशल इन्वेस्टिंगेशन टिम म्हणजेच सीबीआय अधिकारी नवजोत सिमी आणि निकिता पंत यांच्याकडून सुरु आहे.
काही वेळानंतर त्यांना निकिताने कॉल करुन ती ईडीमधून वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे पुरावे प्राप्त झाले असून त्यामुळे त्यांनी तपासात सहकार्य करावे. नाहीतर त्यांच्या घरी पोलिसांना पाठवून त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल अशी धमकी दिली होती. या प्रकाराने होमी एडलकाका हे प्रचंड घाबरले होते. त्यानंतर तिने त्यांना व्हिडीओ कॉल करुन त्यांच्यावर पोलिसांची 24 तास नजर आहे. त्यांना कुठेही जाता येणार नाही, कोणालाही कॉल करता येणार नाही. याच दरम्यान तिने त्यांच्या बँक खात्याची माहिती काढण्यास सुरुवात केली. तिने त्यांच्या बँक बॅलेन्स, म्युचुअल फंड व शेअर मार्केट गुंतवणुक आदींची माहिती घेतली होती. त्यामुळे त्यांनी त्यांची सर्व माहिती सांगितली. दिवसभरातील सर्व माहिती त्यांना सांगून त्यांना त्यांचे दैनदिन काम करावे लागत असल्याने ते प्रचंड मानसिक तणावात सहोते.
दुसर्या दिवशी त्यांना नवजोत सिमी या सीबीआय अधिकार्यांनी संपर्क साधून त्यांची दररोज दोन ते तीन तास ऑनलाईन चौकशी केली होती. या संपूर्ण प्रकरणात त्यांना बाहेर पडायचे असेल तर त्यांना त्यांच्या बँक खात्यासह म्युचुअल फंड, शेअरमार्केट गुंतवणुक, एफडीची रक्कम कोर्टमध्ये जमा करावे लागेल. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांची रक्कम व्याजासहीत परत केली जाईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांना मार्च ते मे 2026 या कालावधीत टप्याटप्याने 1 कोटी 68 लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्स्फर केले होते. या घटनेनंतर त्यांची चौकशी झाली नाही. काही दिवसांत ही रक्कम व्याजासहीत पाठविली जाईल असे सांगूनही त्यांनी त्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली नाही.
हा प्रकार त्यांनी त्यांच्या परिचित आनोष सिगनपोर्या यांना सांगितली असता त्याने त्यांची सायबर ठगाकडून फसवणुक झाल्याचे सांगून त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी सायबर हेल्पलाईनसह दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शिवा प्रसाद, निकिता पंत आणि नवजोत सिमी नाव सांगणार्या अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलकडून तपास सुरु आहे. त्यांच्या बँक खात्यातून ज्या बँक खात्यात ही रक्कम पाठविण्यात आली होती, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.