5.28 कोटीचे सोन्याचे बांगड्या कंपनीच्या तीन सुरक्षारक्षकांनी पळविला
पगार दिला नाही म्हणून दागिने असलेला बॉक्स चोरी करुन पलायन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 मे 2026
मुंबई, – कांदिवलीतील चारकोप परिसरात असलेल्या श्रीजी मॅन्युफॅक्चर कंपनीच्या तीन सुरक्षारक्षकांनी कंपनीत ठेवलेला 5 कोटी 28 लाख रुपयांचा सोन्याचे बांगड्या असलेला बॉक्स चोरी करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. मालकाने पगार दिला नाही म्हणून त्याने ही चोरी केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी तिन्ही सुरक्षारक्षकाविरुद्ध चारकोप पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. मोहम्मद सफीर ऊर्फ मोहम्मद आहमाज, विकास आणि शाहबाज गुज्जर अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांचा चारकोप पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहेत. सुरक्षारक्षकाकडून झालेल्या चोरीच्या घटनेने कंपनीतील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
ही गुरुवारी घटना 14 मे 2026 रोजी रात्री सव्वाआठ ते साडेनऊच्या सुमारास कांदिवलीतील चारकोप, हिंदुस्तान नाका, कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये घडली. 63 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अशोक अमृतलाल वाया हे कांदिवलीतील चारकोप, मार्वे रोड, भूमी सिलेस्टिया अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंगचा कच्चा सोन्यापासून सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीचे कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये श्रीजी मॅन्युफॅक्चररस नावाची एक कंपनी आहे. कंपनीत 32 कर्मचारी व तीन सुरक्षारक्षक कामाला आहेत. या सुरक्षारक्षकामध्ये जम्मू-काश्मीरचा मोहम्मद सफीर, विकास आणि शाहबाज गुज्जर यांचा समावेश होता. कंपनीत बनविलेल्या 5 कोटी 28 लाख 44 हजार 486 रुपयांचे 22 कॅरेटचे 3176 वजनाच्या सोन्याच्या बांगड्या एका लॉजिस्टिक बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते.
गुरुवारी रात्री कंपनीच्या तळमजल्यावर काम करणार्या मोहम्मद सफीरने त्यांना एक व्हॉटअप मॅसेज पाठवून तुम्ही पगार देत नाही म्हणून तो नोकरी सोडून जात असल्याचे सांगितले. या मॅसेजनंतर त्यांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचा मॅनेजर महेंद्र सतिक्युवरला कॉल करुन मोहम्मद सफीरकडे जाण्यास सांगितले. तिथे गेल्यानंतर महेंद्रने त्यांना कॉल करुन कंपनीतील तिन्ही सुरक्षारक्षक जागेवर नाहीत. ते तिघेही नोकरी सोडून गेल्याचे दिसून येत असून त्यांचे कॉल लागत नाही अशी माहिती दिली. त्यानंतर महेंद्रने कंपनीतील सर्व सामानाची पाहणी केली.
यावेळी त्याला 5 कोटी 28 लाख रुपयांचे सोन्याचे बांगड्या असलेले बॉक्स दिसून आला नाही. कंपनीतील तिन्ही सुरक्षारक्षक मोहम्मद सफीर, विकास आणि शाहबाज यांनी सोन्याचे बांगड्या असलेले बॉक्स चोरी करुन तेथून पलायन केले होते. ही माहिती अशोक वाया यांना समजताच ते कंपनीत आले होते. त्यानंतर त्यांनी चारकोप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही सुरक्षारक्षकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मोहम्मद सफीर, विकास आणि शाहबाज गुज्जर यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
या चोरीच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली असून आरोपी सुरक्षारक्षकाच्या अटकेचे आदेश चारकोप पोलिसांना दिले आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.