गावी गेलेल्या वयोवृद्धाच्या घरी अज्ञात व्यक्तीची हातसफाई

पवईतील घटना; अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 मे 2026
मुंबई, (प्रतिनिधी) – गावी गेलेल्या एका वयोवृद्धाच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन सुमारे साडेसात लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई केल्याची घटना पवई परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.

61 वर्षांचे वयोवृद्ध महेंद्र मारुती गायकवाड हे पवईतील मिलिंदनगर, सागर दर्शन इमारतीमध्ये राहतात. 8 मेला ते त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत सातारा येथील जावळी, धुंद गावी बौद्ध जयंतीनिमित्त गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या फ्लॅटची चावी त्यांची विवाहीत मुलीकडे ठेवली होती. 13 मेला त्यांच्या मुलीला त्यांच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले. घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला होता. त्यांच्या घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते, कपाटातील सुमारे साडेसात लाखांचे विविध सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केले होते.

ही माहिती नंतर तिने महेंद्र गायकवाड यांना दिली होती. ही माहिती समजताच ते त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत 14 मेला त्यांच्या पवईतील घरी आले होते. चोरीचा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. गुरुवारी उघडकीस आलेल्या या घरफोडीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पायधुनीत 24 तासांत दोन घरफोडीत पावणेदहा लाखांची लुट
पायधुनी परिसरात गेल्या 24 तासांत दोन घरफोडीच्या गुन्ह्यांत अज्ञात व्यक्तीने सुमारे पावणेदहा लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी दोन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. विरल मनसुखलाल दोषी हे 60 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुुंबियांसोबत घाटकोपरच्या गोरडियानगरात राहतात. त्यांचचा नागदेवी क्रॉस रोडवर दोशी ब्रदर्स मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी विदेशी बॉल बेअरिंग विक्रीचे काम करते.

ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे त्यांना मालाची डिलीव्हरी केली जाते. अनेकदा ग्राहक ऑनलाईन पेमेंट तर काही कॅश स्वरुपात पेमेंट करतात. ही रक्कम त्यांच्या नागदेवी क्रॉस रोडवरील कार्यालयात ठेवून नंतर ती रक्कम शुक्रवारी किंवा शनिवारी बँकेत जमा केली जाते. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या शॉपमध्ये चोरी झाली होती. कार्यालयात प्रवेश करुन अज्ञात व्यक्तीने ड्राव्हरमधील पाचशे, दोनशे, शंभर आणि पन्नास रुपयांच्या 6 लाख 91 हजार 612 रुपयांची चोरी करुन पलायन केले होते.

दुसर्‍या गुन्ह्यांतील तक्रारदार शोएब अब्दुल रशीद भुजवाला हे व्यावसायिक असून ते पायधुनी परिसरात राहतात. त्यांचा लहान भाऊ सईद भुजवाला हा याच परिसरातील जकेरिया आदम इमारत, कांबेकर स्ट्रिटवरवर राहतो. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या कुटुंबियांसोबत थायलंडला गेले होते, मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने तो थायलंडहून मुंबईत परत आला होता. प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला नूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्या घरात कोणीही नसताना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन कपाटातील कपाटातील सोन्याचे दागिने आणि सत्तर हजाराची कॅश असा 2 लाख 86 हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. या दोन्ही घटनेनंतर पायधुनी पोलिसांनी दोन स्वतंत्र घरफोडीचे गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page