आयपीएस अधिकार्यांच्या बदली-बढती दिलेल्या पोलीस दलात फेरबदल
कृष्णकांत उपाध्याय गुन्हे तर धनंजय कुलकर्णी यांची पूर्व विभागात बदली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 मे 2026
मुंबई, – राज्य पोलीस दलातील बदली आणि बढती देण्यात आलेल्या मुंबईतील सात आयपीएस अधिकार्यांना शनिवारी पोस्टिंग देण्यात आली आहे. त्यात परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची गुन्हे शाखेत अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून तर अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी यांची पूर्व प्रादेशिक विभागात बदली करण्यात आली आहे.
गेल्याच आठवड्यात राज्य पोलीस दलातील काही आयपीएस अधिकार्यांची बढती तसेच बदलीचे आदेश गृहविभागाने जारी केले होते. त्यात पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, दिक्षीतकुमार अशोक गेडाम आणि प्रविण व्यकंटराव मुंढे यांना अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. बढतीनंतर या तिन्ही अधिकार्यांची शनिवारी पोस्टिंग देण्यात आली होती. कृष्णकांत उपाध्याय यांची गुन्हे शाखेत, दिक्षीतकुमार गेडाम यांची नायगांवच्या सशस्त्र पोलीस विभागात बदली करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्यांमध्ये गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांची दक्षिण प्रादेशिक विभागात, दक्षिण प्रादेशिक विभागाचे अभिनव देशमुख यांची पश्चिम प्रादेशिक विभागात तर विशेष शाखा एकचे अतिरिक्त पोलीस आयक्त धनंजय कुलकर्णी यांची पूर्व प्रादेशिक विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच राज्य राखीव पोलीस बलाच्या पोलीस उपमहानिरीक्षक मोक्षदा पाटील यांची वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली दाखविण्यात आली आहे. सोमवारी संबंधित सातही अधिकारी बदली झालेल्या जागी रुजू होतील असे बोलले जाते.
दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्याचे आदेश जारी
रविवारी मुंबईतील दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले. परिमंडळ अकराचे पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांची नाशिक शहराच्या गुन्हे अन्वेषण विभाग, परिमंडळ बाराचे महेश चिमटे यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी, दशहतवाद विरोधी पथकाच्या तांत्रिक शाखेचे पोलीस अधिक्षक जयंत मीना यांची परिमंडळ तीन, नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांची परिमंडळ चार, राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप घुगे यांची परिमंडळ अकरा, फोर्स वनचे पोलीस अधिक्षक गजानन राजमाने यांची परिमंडळ बारा, परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त मनिष मलवानिया यांची परिमंडळ एक, परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांची परिमंडळ दोन, विशेष कृती दलाचे पोलीस उपायुक्त निमित गोयल यांची परिमंडळ आठ, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मोहितकुमार गर्ग यांची परिमंडळ नऊमध्ये बदली दाखविण्यात आली आहे.