विदेशातून आणलेल्या कोकेन तस्करीचा डीआरआयकडून पर्दाफाश

11.25 कोटीच्या कोकेनसह दोन महिलांसह चौघांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 मे 2026
मुंबई, – अदिस अबाबा येथून आणलेल्या दोन वेगवेगळ्या कोकेन तस्करीचा महसूल गुप्तचर संचालनायाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह चार प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर या अधिकार्‍यांनी अटक केली. या दोन्ही कारवाईत या अधिकार्‍यांनी सव्वादोन किलो कोकेनचा साठा जप्त केला असून आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत सव्वाअकरा कोटी रुपये इतकी आहे. चारही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विदेशातून ड्रग्ज तस्करीच्या वाढत्या तक्रारीनंतर डीआरआयसह इतर यंत्रणांनी अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. विदेशातून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्‍या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची या अधिकार्‍यांकडून तपासणी केली जात होती. ही मोहीम सुरु असताना शनिवारी रात्री अदिस अबाबा येथून मुंबईत आलेल्या एका महिलेसह दोघांना या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान या दोघांनी तस्करीसाठी ड्रग्ज असलेल्या कॅप्सुल गिळल्याची कबुली दिली होती. त्यामुळे या दोघांनाही ताब्यात घेतल्यांनतर जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यातआले होते. तिथे त्यांच्या पोटातून 84 कॅप्सुल बाहेर काएण्यात आले. त्यात या अधिकार्‍यांना 1 किलो 400 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या कॅप्सुलची किंमत सात कोटी रुपये इतकी आहे.

या कारवाईपूर्वी या अधिकार्‍यांनी अशाच प्रकारे 19 मेला एका महिलेसह दोन प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ते दोघेही अदीस अबाबा येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. त्यांनीही ड्रग्ज असलेले कॅप्सुल गिळल्याची कबुली दिली होती. या दोघांकडून या अधिकार्‍यांनी 63 कॅप्सुल हस्तगत केले होते. त्यात 850 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले होते. त्याची किंमत सुमारे सव्वाचार कोटी रुपये इतकी होती. याच गुन्ह्यांत नंतर दोन्ही महिलांसह चारही प्रवाशांना या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर चौघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page