सलग दोन दिवसानंतर गुन्हे शाखेचे तापी नदी ऑपरेशन यशस्वी

गोळीबारानंतर फेंकून दिलेले पिस्तूल, मॅगझीन, राऊंड जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मार्च २०२४
मुंबई, – सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबारात वापरण्यात आलेले घातक शस्त्रे शूटरने सुरतच्या तापी नदीत फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने दोन दिवसांनंतर तापी नदीचे ऑपरेशन यशस्वी करुन गुन्ह्यांतील दोन पिस्तूल, चार मॅगझीन आणि सतरा राऊंड जप्त केले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित ऑपरेशन सुरु होते. शूटरने दोन मोबाईलची विल्हेवाट लावली होती, या मोबाईलचा आता पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.

१४ एप्रिलला दोन बाईकस्वारांनी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ पाच ते सहा गोळ्या फायर केल्या होत्या. गोळीबारानंतर ते दोघेही पळून गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल या दोन्ही शूटरला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी भूज येथून अटक केली होती. चौकशीत त्यांनी गोळीबारानंतर दोन्ही पिस्तूल, मॅगझीन आणि राऊंड सुरतच्या तापी नदी फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या गुन्ह्यांतील पिस्तूल हस्तगत करणे पोलिसांसाठी एक आव्हान होते. त्यामुळे सोमवारी प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांचे पथक दोन्ही आरोपीसोबत सुरतला गेले होते. या पथकाने तापी नदीत पिस्तूलचा शोध सुरु केला होता. याकामी गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांसह मच्छिमारांनी मदत घेतली होती. सोमवारी रात्री एक पिस्तूल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. मंगळवारी गुन्हे शाखेने पुन्हा तापी नदीत पिस्तूलचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सायंकाळपर्यंत आणखीन एक पिस्तूल, चार मॅगझीन आणि सतरा राऊंड काडतुसे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अशा प्रकारे या पथकाने दोन दिवसांत गोळीबारात वापरलेले दोन्ही पिस्तूल, चार मॅगझीन आणि सतरा राऊंड जप्त करुन तापी ऑपरेशन यशस्वी केले होते. गोळीबार प्रकरणात न्यायवैधक प्रयोगशाळेचा अहवाल एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे दोन्ही पिस्तूलसह मॅगझीन आणि काडतुसे सापडल्याने आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे मिळाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आले. ते पिस्तूल, मॅगझीन आणि काडतुसे फॉरन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे. दुसरीकडे दोन्ही शूटरने आतापर्यंत तीन मोबाईलचा वापर केला होता. त्यापैकी एक मोबाईल जप्त करण्यात आला असून दोन मोबाईलची तोडफोड करुन त्यांनी ते मोबाईलही नदीत फेंकून दिले होते. त्यामुळे या मोबाईलचा पोलिसांकडून शोध सुरु होता. रात्री उशिरापर्यंत दया नायक व त्यांच्या पथकाकडून ही कारवाई सुरु होती. याबाबतचा अधिक तपशील समजू शकला नाही.

यासंदर्भात प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्याशी संपर्क साधला असता दोन दिवसांत गुन्हे शाखेने दोन पिस्तूलसह मॅगझीन आणि राऊंड केल्याचे सांगितले. शूटरने दोन मोबाईलची तोडफोड करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ते मोबाईल जप्त करण्याचे प्रयत्न ुसुरु असल्याचे सांगितले. मात्र या मोबाईलविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page