जोया अख्तरच्या कंपनीच्या हार्डडिस्क चोरीप्रकरणी दोघांना अटक
सहा महिन्यांत 66 हार्डडिस्कची चोरी करुन विक्री केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मे 2026
मुंबई, – प्रसिद्ध लेखिका, निर्माता, दिग्दर्शिका जोया अख्तर हिच्या टायगर बेबी डिजीटल प्रोडेक्शन कंपनीच्या हार्डडिस्कची चोरी करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी दोघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. मोहम्मद शाहिद अजीम खान आणि रितेश सुरेश शहा अशी या दोघांची नावे आहेत. यातील मोहम्मद शाहिद हा कंपनीचा ऑफिस बॉय असून त्याने चोरी केलेल्या हार्डडिस्क रितेश शहा याला प्रत्येकी पंधरा ते वीस हजारांमध्ये विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मेहजबीन मुश्ताक शेख ही तक्रारदार महिला कुलाबा येथे राहत असून गेल्या तीन वर्षांपासून टायबर बेबी डिजीटल या चित्रपटाशी संबंधित एका प्रोडेक्शन कंपनीत एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून काम करते. ही कंपनी लेखिका, निर्माता-दिग्दर्शक जोया अख्तर आणि रिमा कागती यांच्या मालकीची आहे. कंपनीने आतापर्यंत अनेक जाहिरात आणि सिनेमा बनविले आहेत. मार्च 2025 पासून कंपनीचे मुख्य कार्यालय वांद्रे येथील बी. जे रोड, स्प्रिंग्ज अपार्टमेंटमध्ये हलविण्यात आले होते. तिथेच पाच प्रमुख अधिकार्यासह इतर सपोर्ट स्टाफ कामाला आहेत. कंपनीने बनविलेल्या जाहिराती, चित्रपटासह विविध सीन्स आदी सर्व डेटा वेगवेगळ्या हार्डडिस्कमध्ये ठेवला जातो. त्याची जबाबदारी कंपनीचा ऑफिस बॉय मोहम्मद शाहिदवर होती. तो गेल्या सात वर्षांपासून कंपनीत कामाला होता.
गुरुवारी 21 मेला मेहजबीनला कामानिमित्त एका हार्डडिस्कची गरज होती, त्यामुळे तिने मोहम्मद शाहिदला ती हार्डडिस्क आणण्यास सांगितली, मात्र बराच वेळ होऊन त्याने हार्डडिस्क आणून दिली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने स्वतहून हार्डडिस्क आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला काही हार्डडिस्क दिसल्या नाही. चौकशीदरम्यान कंपनीच्या तेरा लाख रुपयांच्या 66 हून अधिक हार्डडिस्ट मिसिंग असल्याचे दिसून आले होते. हा प्रकार तिने जोया अख्तर आणि रिमा कागती यांना सांगितला. अज्ञात व्यक्तीने संबंधित हार्डडिस्क चोरी करुन कंपनीची फसवणुक केली होती. त्यामुळे तिने मोहम्मद शाहिद, कल्पेश पवार या ऑफिस बॉय म्हणून काम करणार्या कर्मचार्यांची चौकशी सुरु केली होती.
चौकशीदरम्यान मोहम्मद शाहिदने गेल्या पाच महिन्यांत 24 हार्डडिस्क चोरी केल्याची कबुली देताना त्या हार्डडिस्क रितेश शहा नावाच्या व्यक्तीला प्रत्येकी पंधरा ते वीस हजारांमध्ये विकल्याची कबुली दिली. या प्रकारानंतर मेहजबीन शेख हिने कंपनीच्या वतीने वांद्रे पोलीस ठाण्यात मोहम्मद शाहिदसह रितेश शहा यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह चोरी आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मोहम्मद शाहिद आणि रितेश शहा या दोघांनाही रविवारी पोलिसांनी अटक केली.
चौकशीत कंपनीच्या कपाटात एकूण 119 हार्डडिस्क होत्या. त्यापैकी 66 हार्डडिस्क डिसेंबर 2025 ते मे 2026 या कालावधीत ऑफिस बॉय म्हणून काम करणार्या मोहम्मद शाहिद याने रितेश शहा याला दिले होते. रितेश हा बोरिवलीच्या माणिकनगर परिसरात राहत असून वडिलांच्या स्टेशनरी शॉपमध्ये काम करतो. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शुक्रवार 29 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.