मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मे 2026
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटच्या सुमारे 25 लाखांचा अपहार करुन एका व्यावसायिकाची मायलेकांनी फसवणुक केल्याचा प्रकार मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दलजीत कौर सिंग अणि अमरजीत सिंग या मायेलकाविरुद्ध मालवणी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. भाड्याने दिलेल्या फ्लॅटवर कर्ज असून कर्जाची परत न केल्याने बँकेने त्यांच्या फ्लॅटवर जप्तीची कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत दोघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
रमेश लिंगायत हे व्यावसायिक असून मालाडच्या जनकल्याण नगरात राहतात. चार वर्षांपूर्वी त्यांना भाड्याने एका फ्लॅटची गरज होती. त्यासाठी ते फ्लॅटचा शोध घेत होते. याच दरम्यान त्यांची दलजीत कौर आणि तिचा मुलगा अमरजीत यांच्याशी ओळख झाली होती. त्यांच्या मालकीचा मालाड येथील जनकल्याणनगर, मरीना इनक्लेव्ह इमारतीच्या एल विंगमध्ये 1904 क्रमांकाचा एक फ्लॅट होता. हा फ्लॅट त्यांना हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा होता. त्यांनाही फ्लॅटची गरज होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्याशी भाड्याने फ्लॅट देण्याची विनंती केली होती. चर्चेअंती त्यांच्यात 25 लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याचे ठरले होते.
याबाबत त्यांच्यात दोन वर्षांसाठी भाडेकरार झाला होता. या करारानंतर त्यांनी त्यांना 25 लाखांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर दलजीत कौरने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला होता. एप्रिल 2022 पासून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत संबंधित फ्लॅटमध्ये राहत होते. अलीकडेच त्यांना या फ्लॅटवर दलजीत कौरने एका खाजगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न केल्यानंतर फायनान्स कंपनीने फ्लॅटवर जप्तीची कारवाई सुरु केली होती. अलीकडेच त्यांनी फ्लॅटचा ताबा घेतला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दलजीत कौर आणि अमरजीतला ही माहिती सांगून त्यांच्याकडे हेव्ही डिपॉझिट म्हणून दिलेल्या 25 लाखांची मागणी केली होती.
मात्र वारंवार मागणी करुनही त्यांनी त्यांना हेव्ही डिपॉझिटची रक्कम दिली नाही. विविध कारण सांगून ते दोघेही मायेलक त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. नंतर त्यांनी त्यांचे कॉल घेणे बंद करुन त्यांचे कॉल ब्लॉक केले होते. या दोघांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच रमेश लिंगायत यांनी मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दलजीत कौर आणि अमरजीत सिंग या दोन्ही मायलेकाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत दोघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.