41 लाखांच्या हिर्यांचा अपहारप्रकरणी वॉण्टेड ब्रोकरला अटक
फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहआरोपी असलेल्या पत्नीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मे 2026
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे 41 लाखांचा हिर्यांचा अपहार करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड ब्रोकरला बीकेसी पोलिसांनी अटक केली. हर्ष पारेख असे या ब्रोकरचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांत त्याची पत्नी सोनल डोडिया ही सहआरोपी असून ती अद्याप फरार आहे. त्यामुळे तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या पती-पत्नीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे.
आयुष राजेंद्र सुराणा हे हिरे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले परिसरात राहतात. त्यांची केसीफिक डायमंड नावाची एक कंपनी असून या कंपनीचे वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये एक कार्यालय आहे. याच कार्यालयातून त्यांच्या कंपनीकडून हिर्यांची खरेदी-विक्री केली जात होते. त्यांच्याकडे हर्ष पारेख हा ब्रोकर म्हणून काम करत असून तो गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या परिचित होता. अनेकदा त्याने त्यांच्याकडून क्रेडिटवर हिरे घेतले होते, या हिर्यांचे पेमेंट किंवा हिरे परत करुन त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला होता. सोनल ही त्याची पत्नी असून तीदेखील त्याच्यासोबत हिरे खरेदी-विक्रीत दलालीचे काम करते.
11 सप्टेंबर 2025 रोजी सोनल ही त्यांच्या कार्यालयात आली होती. तिने तिच्याकडे गुजरातच्या अहमदाबादचे काही हिरे व्यापारी आले असून त्यांना हिर्यांची गरज असल्याचे सांगितले होते. ती हर्षची पत्नी असल्याने त्यांनी तिला 80 कॅरेटचे 41 लाख रुपयांचे हिरे क्रेडिटवर दिले होते. एका आठवड्यात व्यवहार पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन ती हिरे घेऊन निघून गेली होती. मात्र दिलेल्या मुदतीत सोनल आणि हर्षने पेमेंट केले नाही किंवा हिरे परत केले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांना कॉल केला होता, यावेळी त्यांनी अद्याप व्यवहार पूर्ण झाला नसून व्यवहार पूर्ण होताच पेमेंट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी त्यांचे आश्वासन पाळले नाही.
सहा ते सात महिने उलटूनही त्यांनी हिर्यांचे पेमेंट दिले नाही तसेच हिरे परत केले नाही. नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. पती-पत्नीकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच आयुष सुराणा यांनी एप्रिल 2026 रोजी या दोघांविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सोनल डोडीया आणि हर्ष पारेख यांच्याविरुद्ध पोलिसांनी हिर्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असतानाच हर्ष पारेखला एक महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने सुमारे 41 लाखांच्या हिर्यांचा अपहार करुन या हिर्यांची परस्पर हिरे व्यापार्यांना विक्री करुन ही फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हर्षने अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्यांकडून क्रेडिटवर हिरे घेऊन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहे. या गुन्ह्यांत सोनल डोडिया हिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.