जोगेश्वरीतील ट्रॅव्हेल्स बस अपघातात 32 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू
मद्यप्राशन करुन ट्रॅव्हेल्स बस चालविणार्या चालकास अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मे 2026
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका ट्रॅव्हेल्स बसची धडक लागून दिपेन जैन या 32 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याची मैत्रिण काजल दिनेश मदेशिया ही जखमी झाली. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी बसचालक प्रसाद सुरेश जाधव याला अटक केली आहे. मेडीकलनंतर प्रसादने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मद्यप्राशन करुन तो ट्रॅव्हेल्स बस चालवत असल्याने त्याची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत ट्रॅव्हेल्स मालकासह इतर कर्मचार्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
काजल ही 26 वर्षांची तरुणी नालासोपारा येथे राहते. सहा महिन्यांपूर्वी तिची साथी अॅपच्या माध्यमातून दिपेन जैन या तरुणाशी ओळख झाली होती. दिपेन हा अंधेरी येथे राहत होता. ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिनेही त्याला होकार दिला होता. रविवारी दुपारी पावणेचार वाजता ते दोघेही अंधेरी रेल्वे स्थानकात भेटले होते. तेथून ते दोघेही दिपेनच्या अॅक्टिव्हा बाईकवरुन जुहू येथील हरे राम हरे कृष्णा मंदिरात आणि नंतर गोरेगाव येथील आरे कॉलनीतील हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते.
या भेटीदरम्यान या दोघांनी लग्नाची बोलणी केली होती. ही बोलणी करुन ते दोघेही दिपेनच्या बाईकवरुन जोगेश्वरीच्या दिशेने निघाले होते. रात्री पावणेआठ वाजता ते जेव्हीएलआर जंक्शनजवळ आले होते. यावेळी भरवेगात जाणार्या एका ट्रॅव्हेल्स बसने त्याच्या अॅक्टिव्हा बाईकला जोरात धडक दिली होती. या अपघातात दिपेनसह काजल हे दोघेही जखमी झाले होते. बसच्या चाकाखाली आल्याने दिपेन गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे या दोघांनाही तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच दिपेनला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर गुडघ्याला दुखापत झाल्याने काजलवर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते.
अपघाताची माहिती मिळताच जोगेश्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी आरोपी बसचालक प्रसाद जाधव याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याची नंतर मेडीकल करण्यात आली होती. त्यात त्याने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी काजल मदेशिया हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ट्रॅव्हेल्स बसचा चालक प्रसाद जाधव याच्याविरुद्ध मद्यप्राशन करुन हलगर्जीपणाने बस चालवून एका तरुणाच्या मृत्यूस तर तक्रारदार तरुणीला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.