24 मेट्रीक टन स्टिलसाठी घेतलेल्या साडेनऊ लाखाचा अपहार
एक महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या व्यावसायिकाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मे 2026
मुंबई, – दादर येथील बांधकाम साईटवर 24 मेट्रीक टन स्टिल पाठवितो असे सांगून स्टिलसाठी घेतलेल्या साडेनऊ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी शिवम सिंग या आरोपी व्यावसायिकाला माहीम पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत शिवमला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हर्ष सुरेश गुप्ता हे व्यावसायिक असून माहीम परिसरात त्यांच्या आई-वडिल आणि पत्नीसोबत राहतात. त्यांची हर्ष डेव्हलपर अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर नावाची एक खाजगी कंपनी असून या कंपनीचे माहीम परिसरात कार्यालय आहे. त्यांच्या कंपनीकडून दादर येथील एका 21 मजली इमारतीचे प्रोजेक्ट सुरु आहे. त्यासाठी त्यांना स्टिलची गरज होती. मार्केटमधून वेंडर शोधून त्यांच्याकडून ते स्टिल विकत घेत होते. डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या एका कर्मचार्याने त्यांना शिवम सिंगविषयी माहिती दिली होती. त्याची अंबरनाथ येथे स्काय इन्फ्रा नावाची कंपनी असून ही कंपनीत त्यांना स्टिल देईल असे सांगितले.
याबाबत त्याच्याशी संपर्क साधून स्टिलची मागणी करण्यात आली होती. शिवमने त्यांच्या मागणीनुसार स्टिल देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे 24 मेट्रीक टन स्टिलची ऑर्डर दिली होती. स्टिल, जीएसटीसह त्यांनी त्याला 13 लाख 34 हजार रुपयांचे पेमेंट केले होते. मालाची डिलीव्हरी त्याला दादर येथील बांधकाम इमारतीच्या साईटवर देण्यास सांगण्यात आले होते. त्याच्याकडून 12 डिसेंबरपर्यत स्टिलची डिलीव्हरी होईल असे सांगण्यात आले होते. मात्र त्याने स्टिलची डिलीव्हरी केली नाही.
वारंवार विचारणा करुनही त्याने स्टिलची डिलीव्हरी पाठविली नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्या पेमेंटची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांना चार लाखांचे पेमेंट केले. मात्र उर्वरित साडेनऊ लाख रुपये परत केले नाही. संपर्क साधल्यानंतर तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान त्याने त्यांना एक धनादेश दिला, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्यानंतर त्याने त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. त्यांचा कॉल ब्लॉक केला होता. स्टिलची डिलीव्हरी करतो असे सांगून शिवमने स्टिलची डिलीव्हरी न देता साडेनऊ लाखांचा अपहार करुन फसवणुक केली होती.
या घटनेनंतर हर्ष गुप्ता यांनी माहीम पोलिसांत शिवम सिंगविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत एक महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या शिवमला दोन दिवसांपूर्वी माहीम पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवमने अशाच प्रकारे इतर काही व्यावसायिकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.