एमडी ड्रग्जच्या प्रयोगशाळेचा पर्दाफाश करुन तिघांना अटक
50.74 कोटीच्या एमडीसह पिस्तूल, काडतुसांचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 मे 2026
मुंबई, – एमडी ड्रग्ज तयार करणार्या एका प्रयोगशाळेचा कांदिवली युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. मोहम्मद शोएफ शौकतअली मंसुरी, सुफीयान सलीम मंसुरी आणि मामूनी सुनिल सरकार अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी 50 कोटी 74 लाख रुपयांचा एमडी ड्रग्ज, ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे साहित्य, एक देशी बनावटीचे पिस्तूल 19 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील मामूनी या महिलेने आग्रीपाडा येथील राहत्या घरी एमडी ड्रग्ज बनविण्याचा प्रयोगशाळा सुरु केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईसह इतर शहरात एमडी ड्रग्जला प्रचंड मागणी होत असल्याने एमडी ड्रग्जची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना आग्रीपाडा परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये काहीजण एमडी ड्रग्ज बनविणारी एक प्रयोगशाळेत सुरु केली आहे. या प्रयोगशाळेत एमडी ड्रग्ज बनविले जात असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर संबंधित आरोपीविरुद्ध ठोस कारवाईचे आदेश कांदिवली युनिटला देण्यात आले होते.
या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नाईक, उल्हास खोलम, पोलीस उपनिरीक्षक निखील शेळके, संतोष पाटील, सहाय्यक फौजदार विनोद निकम, पोलीस हवालदार सुधाकर देसाई, भरत मोहिते, धनाजी मोहिते, भरत मोहिते, अरुण राठोड, सुभाष खेमनर, पोलीस शिपाई सतीश गवळी, संजय खरात, नरेंद्र रोकडे, हनुमंत राणे, रुपम गिभल, अविनाश गालवे, लक्ष्मण राऊत, महिला पोलीस शिपाई स्नेहा आलेकर, आशा शिखरे या पोलीस पथकाने आग्रीपाडा येथील घासगल्ली, यास्मिन टॉवरच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1004 मध्ये छापा टाकला होता.
या कारवाईत पोलिसांना तिथे एमडी ड्रग्ज बनविणारी एक प्रयोगशाळा सुरु असून तिथे मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज बनविले जात असल्याचे दिसून आले. यावेळी फ्लॅटमध्ये राहत असलेल्या मामूनी सरकार या महिलेसह तिचे दोन सहकारी सुफीयान मंसुरी आणि मोहम्मद शाएफ या तिघांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 29 कोटी 8 लाख 23 हजार 100 रुपयांचा 8 किलो 305 किलो लिक्वीड एमडी आणि इतर साहित्य, 21 कोटी 65 लाख 80 हजार रुपयांचा 6 किलो 188 ग्रॅम एमडी ड्रग्ज असा 14 किलो 493 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आणि त्यासाठी लागणारे साहित्य, कच्चा माल, उपकरणे 50 कोटी 74 लाख 3 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मुद्देमालासह घटनास्थळी पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 19 जिवंत काडतुसे सापडले.
यातील मोहम्मद शोएफ आणि सुफीयान हे दोघेही मांडवीतील नळबाजारात राहत असून जुनी वाहने स्क्रॅप करण्याचे काम करतात. मामूनी ही महिला मूळची कोलकाताचा रहिवाशी असून सध्या ती आग्रीपाडा येथील घासगल्ली, यास्मिन टॉवर अपार्टमेंटमध्ये राहत होती. हा फ्लॅट तिने 50 हजार रुपयांच्या भाड्याने घेतला होता. तिथेच तिने एमडी ड्रग्ज बनविण्याचा प्रयोगशाळा सुरु केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून ती इतर दोघांच्या मदतीने एमडी ड्रग्ज बनवत असल्याचे उघडकीस आले आहे.
या आरोपींविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएससह आर्म्स अॅक्ट कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या तिघांनाही मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.