साडेचार कोटीच्या सोन्याचा दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक
गुन्हा दाखल होताच मुख्य आरोपीस कोलकाता येथून अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 मे 2026
मुंबई, – सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या तीन ज्वेलर्स व्यापार्याचे साडेचार कोटीचे 2959 ग्रॅम वजनाचे सोन्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी एका व्यापार्याला कोलकाता येथून शिवाजी पार्क पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. तन्मय लालमोहन मैती असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा कोलकाताच्या हुगळीचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून गुन्ह्यांतील बहुतांश सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
38 वर्षांचे तक्रारदार संजय मगराज जैन हे व्यवसायाने ज्वेलर्स व्यापारी आहेत. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत प्रभादेवी येथील शंकर घाणेकर मार्ग, शिला कुंज अपार्टमेंटमध्ये राहत असून याच परिसरात त्यांच्या मालकीचे एक ज्वेलर्स शॉप आहे. तन्मय मैती हा त्यांचा परिचित व्यापारी असून त्याचा स्वतचा दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. दादर येथील मारुती मंदिराजवळील पाटीलवाडी परिसरात त्याचा एक कारखाना असून याच कारखान्यात इतर कारागिर कामाला आहेत. संजय जैन यांनी तन्मयकडे अनेकदा सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिले होते. त्यानेही त्यांना वेळेवर दागिने देऊन त्यांचा विश्वास संपादन केला होता. या कामाचा त्याला योग्य मोबदला दिला जात होता. 14 मे आणि 15 मे 2026 रोजी संजय जैन यांच्यासह इतर दोन ज्वेलर्स व्यापार्यांनी तन्मयकडे 4 कोटी 51 लाख 85 हजार 33 रुपयांचे 2959 ग्रॅम वजनाचे सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते.
एका आठवड्यात सोन्याचे दागिने बनवून देतो असे सांगूनही त्याने त्यांना दिलेल्या मुदतीत सोन्याचे दागिने दिले नाही. कॉल केल्यानंतर त्याने त्यांना प्रतिसाद दिला नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच संजय जैन हे त्याच्या दादर येथील कारखान्यात गेले होते. यावेळी त्यांना तन्मय हा कारखाना बंद करुन पळून गेल्याचे दिसून आले. सुमारे साडेचार कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन त्याने संजय जैन यांच्यासह इतर दोन ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तन्मय मैतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त महेंद्र पंडित यांनी गंभीर दखल घेत शिवाजी पार्क पोलिसांना आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण भोर, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद पवार, पोलीस निरीक्षक सानप, किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश जमदाडे, पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, पोलीस हवालदार मांगले, साबळे, सोनावणे, पोलीस शिपाई गोतरणे, भोकरे, सूर्यवंशी, एकवडे, हगवणे यांनी तपास सुरु केला होता.
तपासात तन्मय हा मूळचा हुगळीच्या खानाकुल, ठाकूराणी चौकचा रहिवाशी असून तो सध्या दिवा मुंबादेवी कॉलनीजवळील शिवनेरी अपार्टमेंटमध्ये राहत होता. तो कार बुक करुन त्याच्या घरी गेल्याचे पोलिसांना समजले होते. त्यामुळे एक टिम त्याच्या घरी पाठविण्यात आली होती. मात्र तो त्याच्या घरी सापडला नाही. तिथे चौकशी केल्यानंतर तो कोलकाताला पळून गेल्याची माहिती पोलिसांना समजली होती. या माहितीनंतर या पथकाने हुगळी ग्रामीण परिसरातील त्याच्या घराजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या तन्मय मैती याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने साडेचार कोटीच्या दागिन्यांचा अपहार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला अटक करुन तेथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला ट्रॉन्झिंट रिमांड दिले होते. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. त्याच्याकडून बहुतांश सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही व्यापार्यांच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.