ऑनलाईन फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांत तीन सायबर ठगांना अटक
शेअरसह पॉईट रिडीमच्या नावाने महिलेसह व्यावसायिकाची फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मार्च २०२४
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील तीन सायबर ठगांना अंधेरी आणि बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. आकाश गोपालप्रसाद अग्रवाल, रोहितकुमार दामोदर प्रसाद आणि सुमीतकुमार विजयभाई चौहाण अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शेअरमार्केट गुंतवणुकीसह बोगस लिंकद्वारे डेबीट कार्डचे पॉंईट रिडीम करण्याची बतावणी करुन या तिघांनी ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या अटकेने अशाच ऑनलाईन फसवणुकीचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
३६ वर्षांची तक्रारदार महिला अंधेरी येथे राहत असून ती एका खाजगी कंपनीत ऑपरेशन हेड म्हणून काम करते. मार्च महिन्यांत ती तिच्या घरी होती. यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीने तिच्या डेबीट कार्ड पॉंईट रिडीम करण्यासाठी बोगस लिंक पाठवून, तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. ती लिंक ओपन केल्यानंतर तिला तिच्या बँकेचे वेब पेज दिसून आले. त्यामुळे तिने तिच्या डेबीट कार्डसह पासवर्ड आणि मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर काही मिनिटांत तिच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाले होते. तिने बँक स्टेटमेंटची तपासणी केल्यानंतर तिच्या खात्यातून ३ लाख ७८ हजार ९५० रुपये डेबीट झाले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने अंधेरी पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. आरोपींचा शोध सुरु असताना उत्तरप्रदेशच्या विहार कॉलनी-सरस्वती विहार येथून पोलिसांनी आकाश अग्रवाल आणि रोहितकुमार प्रसाद या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले होते. त्यानतर या दोघांनाही पोलिसांनी अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी विविध बँकेचे डेबीट कार्ड, मोबाईल, सिमकार्ड आणि १ लाख ८८ हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
अन्य एका गुन्ह्यांत सुमीतकुमार चौहाण या ठगाला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. यातील तक्रारदार व्यावसायिक असून त्यांचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांना सोशल मिडीयावर शेअर मार्केटसंबंधित एका खाजगी कंपनीची जाहिरात दिसी होती. त्यात शेअरमध्ये गुंतवणुकीवर चांगला परवाता मिळेल अशी जाहिरात करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी जाहिरातीला प्रतिसाद देताच त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले होते. त्यात त्यांना शेअरमार्केटमधील गुंतवणुकीबाबत माहिती दिली जात होती. याच दरम्यान ग्रुपच्या ऍडमिनने त्यांना एका खाजगी कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी २७ जानेवारी ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत विविध कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे तीन लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र या गुंतवणुकीवर त्यांना कुठलाही परवाता मिळाला नव्हता. याबाबत विचारणा केल्यानंतर समोरील व्यक्तींनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांत गुन्हा दाखल होताच तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सुमीतकुमार चौहाण याला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली होती. शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने फसवणुक करणार्या सायबर ठगांना त्याने बोगस बँक खाते उघडून दिले होते. या खात्यात जमा होणारी रक्कम तो सायबर ठगांना देत होता. त्यासाठी त्याला ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळत होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याच्या इतर काही सहकार्यांचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.