लोन अ‍ॅपच्या माध्यमातून खंडणी वसुली करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

वेगवेगळ्या परिसरातून सहाजणांना अटक; इतर गुन्ह्यांची उकल होणार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 मे 2026
मुंबई, – ऑनलाईन लोन अ‍ॅपच्या माध्यामातून खंडणी वसुली करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत वेगवेगळ्या परिसरातून सहाजणांना पोलिसांनी अटक केली. सुदेश चंद्रकांत वाघरे, पवेश नारायण गोरीवले, प्रविण पांडुरंग जाधव् प्रविण सुखदेव थोरात, रवी मदनलाल जैस्वाल आणि वाल्मिकी गेनालाल गुप्ता अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टाने शनिवार 30 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अनेकांना लोन अ‍ॅपच्या माध्यमातून अनेकांचा मानसिक छळ करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसुली केली आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अक्षय ओमप्रकाश सिंग हे त्यांच्या कुटुंबियासोबत अंधेरीतील मरोळ-मरोशी रोड परिसरात राहत असून सध्या एका नामांकित बँकेत कामाला आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी कॅश माय पेमेंट या ऑनलाईन लोन अ‍ॅपच्या माध्यमातून 22 हजार रुपयांचे लोन घेतले होते. यावेळी एपीके फाईलच्या माध्यमातून आरोपींनी त्यांची वैयक्तिक माहिती प्राप्त केली होती. लोनसह व्याजाची रक्कम भरुनही अज्ञात व्यक्तीकडून त्यांचा मानसिक शोषण सुरु होता. त्यांनी आणखीन पैसे भरावे म्हणून त्यांना धमकी दिली जात होती. पंधरा टक्के व्याजदराने कर्जाची परतफेड करणे आवश्यक असताना आरोपी त्यांच्याकडून 512 टक्के व्याजदाराने रक्कम मागत होते.

22 मेला ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी असताना तिथे दोन तरुण आले होते. त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी करुन बेदम मारहाण केली होती. आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून ते त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होते. त्यांना वेगवेगळ्या मोबाईलवरुन धमकी दिली जात होती. त्यांनी व्याजाची रक्कम भरली नाहीतर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली जात होती. त्यांच्या मुलीवर अ‍ॅसिड हल्ला करण्याची धमकी देत होते. ऑनलाईन अ‍ॅपवरुन घेतलेल्या लोनची परतफेड करताना त्यांनी आतापर्यंत सतरा लाख साठ हजार रुपये भरले आहे. तरीही या आरोपींनी त्यांना अठराहून अधिक ऑनलाईन लोन अ‍ॅपवरुन 7 लाख 5 हजार 570 रुपयांचे लोन घेण्यास प्रवृत्त केले.

या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना जास्त व्याजदराने पैसे भरण्यासाठी धमकी देत होते. त्यांचा कॉल घेतला नाहीतर त्यांच्यासह त्यांच्या बँकेतील कर्मचार्‍यांना फोन करुन त्यांची बदनामी करत होते. या व्यक्तीकडून होणार्‍या मानसिक छळाला, जिवे मारण्यासह मुलीवर अ‍ॅसिड हल्ल्याच्या धमकीमुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी त्यांनी घडलेला प्रकार एमआयडीसी पोलिसांना सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांच्या अटकेचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर या आरोपीविरुद्ध खंडणीसह जिवे मारण्याची धमकी देणे तसेच अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यांचा तपास नंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या युनिट दोनकडे सोपविण्यात आला होता. हा तपास हाती येताच गुन्हे शाखेने अक्षय सिंग यांना येणार्‍या कॉलची माहिती काढून आरोपींची जास्तीत जास्त मिळविण्याचा प्रयत्न केला. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक प्रशांत गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक जयेश कुलकर्णी, रामेश्वर घाटोळ, नितीन भोसले, विजय भेंडाळे, अंकुश न्यायनिर्गूणे, सहाय्यक फौजदार मंगेश सावंत, पोलीस हवालदार राणे, परब, पाडवी, मोटे, लोहकारे, काळे, बोरसे, थिटमे, डेरे, हरड, पोलीस शिपाई शिंदे, आव्हाड, कळसाने, शिंदे यांनी वेगवेगळ्या परिसरातून सहाजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीत यातील सुदेश वाघरे हा नवी पनवेलच्या शिवनगर, सिद्धीविनायक अपार्टमेंट, पवेश गोरीवले हा कांदिवलीतील वडारीपाडा, हनुमाननगर, प्रविण जाधव हा मालाडच्या मालवणी, अंबुजवाडी, प्रविण थोरात दहिसरच्या कोकणीपाडा, जय भवानी चाळ, रवी जैस्वाल विरारच्या कारगिलनगर, माऊली कृपा अपार्टमेंट आणि वाल्मिकी गुप्ता विरारच्या भाटपाडा, बरफपाड्यातील आई जिवदानी चाळीत राहतो. ते सर्वजण ऑनलाईन लोन अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारदार अक्षय सिंग यांना सतत कॉल करुन, त्यांचा मानसिक छळ करुन, त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देत होते, त्यांनी आणखीन पैसे भरावे यासाठी त्यांची त्यांच्या सहकार्‍यांमध्ये बदनामी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या सर्वांना पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर त्यांना मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या कटातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहेत, त्यांचा पोलिसांकडून शोध सुु आहे. प्राथमिक तपासात या टोळीने अनेकांना ऑनलाईन लोन अ‍ॅपच्या माध्यामतून लोन घेण्यास प्रवृत्त करुन त्यांच्याकडून जास्त व्याजदराने पैसे वसुल केले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसुली केली आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविणयात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page