भाड्याच्या घरातील एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखान्याचा पर्दाफाश

75 कोटीच्या एमडीसह ड्रग्ज बनविण्याच्या साहित्यासह दोघांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 जून 2026
मुंबई, – गुजरातच्या नर्मदा, राजपिपला-नांदोद परिसरातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या ड्रग्ज निर्मितीचा साकिनाका पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली असून या कारवाईत पोलिसांनी सुमारे 75 कोटीचे एमडी ड्रग्ज, ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे केमिकल आणि इतर साहित्य जप्त केला आहे. मुस्कान समीर खान आणि वझुल कमर अब्दुल वफा चौधरी ऊर्फ पप्पू अशी या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही साकिनाका पोलिसांनी अशाच प्रकारे एमडी ड्रग्जचा कारखाना उद्धवस्त केला आहे.

गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांनी एमडी ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना 21 मेला अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर काहीजण एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती साकिनाका पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून मुस्कान खान या 26 वर्षांच्या महिलेस ताब्यात घेतले होते. तिच्या अंगझडतीत पोलिसांना 101 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले होते. त्याची किंमत सुमारे वीस लाख रुपये होती. चौकशीत मुसकान ही साकिनाका येथील पाईपलाईन, कैलास पुरम परिसरात राहत होती. सध्या ओला उबेरमध्ये चालक म्हणून काम करत होती.

ती वझुल नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात होती. त्यानेच तिला एमडी ड्रग्ज विक्रीसाठी दिले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. वझुल हा मुंब्रा-कौसाच्या रेहमानिया हॉस्पिटल, जुना मुंबई-पुणे रोडच्या माहेर चाळीत राहत होता. त्याच्या घरी गेलेल्या पोलिसांना वझुल हा तेथून पळून गेल्याचे दिसून आले होते. त्याचा शोध सुरु असताना त्याला 26 मेला शिळफाटा परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच मुस्कानला एमडी ड्रग्ज विक्रीसाठी दिल्याची कबुली दिली. ते ड्रग्ज त्याने गुजरात येथून आणले होते. गुजरातच्या नर्मदा जिल्हा, नांदोद-राजपिलला तालुक्याच्या वरखड परिसरात संशयित आरोपीने एक भाड्याने फ्लॅट घेतला होता. याच फ्लॅटमध्ये त्याने एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरु केला होता. याच कारखान्यातून बनविलेल्या एमडीचे नंतर देशभरात विविध शहरात विक्री केली जात होती.

ही माहिती प्राप्त होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे, प्रभारी पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपक गिरमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काशिनाथ वणवे, पोलीस उपनिरीक्षक पंकज रामधन परदेशी, पोलीस हवालदार शशिकांत हरी पाटील, चंद्रकांत शामराव पवार, नितीन उत्तम खैरमोडे, पोलीस शिपाई अनिल पांडुरंग करांडे यांनी तिथे छापा टाकला होता. या फ्लॅटमध्ये एमडी ड्रग्ज बनविले जात असल्याचे उघडकीस आले.

घटनास्थळाहून पोलिसांनी 74 कोटी 46 लाख रुपयांचे 20 किलो 400 ग्रॅम वजनाचे द्रव्यरुपी एमडी, 7 लाख 80 हजार रुपयांचे 26 किलो 2 ब्रोमो, 4 मेथिलानिलिन केमिकल, अडीच लाखांचे 50 लिटर 4 मेथिलप्रोपिपोफेनोन केमिकल, वीस हजार रुपयांचे 20 लिटर केमिकल, वीस हजार रुपयांचे 20 लिटर मोनोमेथिलामाईन केमिकल, 1 लाख 40 हजार रुपयांचे 35 लिटर क्लोरोफॉर्म केमिकल, 5 लाख 40 हजार रुपयांचे साडेतीन लिटर ब्रोमीन केमिकल, 75 हजार रुपयांचे तीन स्टेरर मशीन, एक लाखांचे टाटा वोल्टास कंपनीचे कमर्शियल फ्रिज, प्रत्येकी 50 हजार रुपयांचे पाच गोलाकार फ्लॅक आणि हिटींग मेटल आदी 74 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अशा प्रकारे मुंबईसह मुंब्रा आणि गुजरात येथील कारवाईत पोलिसांनी सुमारे 75 कोटीचा एमडीसह ड्रग्ज बनविण्याचा साहित्य जप्त केले आहे. दोन्ही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page