बिल अपडेट करण्याची बतावणी करुन वयोवृद्ध महिलेची फसवणुक

महिलेच्या तक्रारीवरुन अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जून २०२६
मुंबई, – महानगर बिल अपडेट करा नाहीतर रात्री उशिरा गॅस कनेक्शन बंद होईल अशी भीती घालून एपीके फाईल पाठवून अज्ञात सायबर ठगाने सहा वेगवेगळे ऑनलाईन व्यवहार करुन एका वयोवद्ध महिलेची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात घडला. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. एपीके फाईल ओपन केल्यानंतर काही वेळात तक्रारदार महिलेचा मोबाईल हॅक करुन अज्ञात सायबर ठगाने ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांचा अंधेरी पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

विद्या प्रदीप अवरशेखर ही ७१ वर्षांची वयोवृद्ध महिला अंधैरीतील सहार रोड, कल्पिता एन्कलेव्ह अपार्टमेंटमध्ये राहते. ती निटी विहार लेक येथून लेखा अधिकारी म्हणून निवृत्त झाली आहे. मंगळवारी २ मेला ती मार्केटमध्ये गेली होती. यावेळी तिच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज पाठविला होता. त्यात तिचे महानगर गॅस लिमिटेडचे गॅस कनेक्शन रात्री बारा वाजता बंद होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे घरी आल्यानंतर मॅसेजवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. मात्र समोरील व्यक्तीने कॉल घेतला, तिला मॅसेजद्वारे तिच्याशी लवकरच संपर्क साधला जाईल असे सांगणयात आले होते.

रात्री आठ वाजता तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तिच्या महानगर गॅसचा बिल पेमेंट अपडेट करा अन्यथा त्यांचा गॅस कनेक्शन बंद होईल असे सांगितले. त्यानंतर त्याने तिला पेमेंटसाठी एक एपीके फाईल पाठविली होती. ही फाईल ओपन करुन तिने तिची माहिती अपलोड करताना दहा रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर काही वेळात तिच्या क्रेडिट कार्डवरुन सहा वेगवेगळे ऑनलाईन व्यवहार झाले होते. त्यानंतर तिचा मोबाईल हॅक झाला होता.

हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिच्या शेजारी राहणार्‍या अजय सोनी या तरुणाला ही माहिती सांगितली. त्याने बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करुन बँक खाते ब्लॉक करण्याची विनंती केली. बँकेत जाऊन चौकशी केल्यानंतर तिला तिच्या क्रेडिट कार्डवरुन अज्ञात सायबर ठगाने २ लाख ६९ हजार रुपयांचे ऑनलाईन व्यवहार केल्याचे दिसून आले. गॅस बिल अपडेट करण्याची बतावणी करुन या ठगाने एपीके फाईल पाठवून, तिचा मोबाईल हॅक करुन ही ऑनलाईन फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच तिने घडलेला प्रकार अंधेरी पोलिसांना सांगून संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगाचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास पश्‍चिम सायबर सेलचे अधिकारी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page