फ्लॅटच्या आमिषाने २८ लाखांना गंडा घालणार्‍या भामट्यास अटक

म्हाडा लॉटरीमधील फ्लॅटच्या बहाण्याने पिता-पूत्राची फसवणुक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ जून २०२६
मुंबई, – फ्लॅटच्या आमिषाने सुमारे २८ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी मुकेश सोहनलाल भंडारी नावाच्या एका भामट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत त्याचा दुसरा सहकारी मनोज नायक हा सहआरोपी आहे. त्यांच्यावर म्हाडा लॉटरीमधील फ्लॅटच्या बहाण्याने एका पिता-पूत्राची फसवणुक केल्याचा आरोप आहे.

यातील तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवली परिसरात राहतात. सध्या ते एका नामांकित खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर कामावर आहेत. २००८ साली त्यांना अंधेरी येथे एक फ्लॅट घ्यायचा होता. याच दरम्यान त्यांनी त्यांच्या वडिलांचा मित्र मुकेश पांचाळ आणि मनोज नायक यांना फ्लॅटविषयी माहिती दिली होती. यावेळी मुकेशने मनोज हा इस्टेट एजंट असल्याचे तो त्यांना म्हाडाचा तेरा लाखांमध्ये स्वस्तात फ्लॅट देईल. गुंतवणुक म्हणून फ्लॅट खरेदी करुन तिथे भाडेकरु ठेवून त्यांना चांगला भाडे मिळवून देतो असे सांगितले. हा प्रपोजल चांगला वाटल्याने त्यांनी म्हाडा फ्लॅटसाठी प्रयत्न करण्याची दोघांनाही विनंती केली होती.

ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला तेरा लाख दहा हजार रुपयांचे पेमेंट केले, मात्र आठ महिने उलटूनही त्यांनी त्यांना म्हाडा फ्लॅटचा ताबा दिला नाही. यावेळी मनोजने मुकेश भंडारीची म्हाडामध्ये चांगली ओळख असून तो त्यांना लवकरच म्हाडा लॉटरीमध्ये फ्लॅट देईल असे सांगून त्यांच्याकडून आणखीन काही दिवसांची मुदत मागितली होती. काही दिवसांनी त्यांनी अंधेरी येथे म्हाडा इमारतीचे बांधकाम सुरु असून तिथेच त्यांना आणखीन एक फ्लॅट देण्याचे आश्‍वासन दिले होते. दुसर्‍या फ्लॅटसाठी त्याने त्यांच्याकडून पंधरा लाख रुपये घेतले.

याच दरम्यान त्यांनी त्यांच्यासोबत अंधेरीतील एमआयडीसी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर रोड क्रमांक आठ, भीमनगरातील एका फ्लॅटचे सेल अग्रीमेंट तयार केले होते. मात्र काही महिने उलटूनही त्यांना प्रत्यक्षात फ्लॅटचा ताबा दिला नाही. अशा प्रकारे जानेवारी २००८ ते जानेवारी २०२६ या कालावधीत त्यांनी मनोज आणि मुकेश या दोघांना २० लाख ५० हजार कॅश तर साडेसात लाख रुपये धनादेशद्वारे असे २८ लाख रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा विविध करारनामा करुन म्हाडा फ्लॅटचे कागदपत्रे दिले नव्हती.

जवळपास अठरा वर्षांपासून ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे तक्रारदारांनी फ्लॅटचा व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडून फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांना त्यांना २८ लाख रुपये परत केले नाही. त्यामुळे त्यांनी  जानेवारी २०२६ रोजी एमआयडीसी पोलिसांत मुकेश आणि मनोज यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या २८ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु असताना ही शोधमोहीम सुरु असताना मुकेश भंडारीला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मुकेश आणि मनोज यांनी अशाच प्रकारे फ्लॅटच्या आमिषाने काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page