घरी येण्यास नकार दिला म्हणून अल्पवयीन मुलाची हत्या

पळून गेलेल्या आरोपी मित्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जून २०२६
मुंबई, – घरी येण्यास नकार दिला म्हणून एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची त्याच्याच परिचित पंधरा वर्षांच्या आरोपी मित्राने चाकूने वार करुन हत्या केली. साईनाथ पलानीस्वामी देवेंद्र असे या हत्या झालेल्या मुलाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी गोलू नावाच्या अल्पवयीन आरोपी मित्राला ऍण्टॉप हिल पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्वयीन असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.

राज गणेश देवेंद्र हा मुलगा ऍण्टॉप हिल येथील सायन-कोळीवाडा परिसरात राहतो. शनिवारी १३ जूनला रात्री एक वाजता तो त्याचे दोन मित्र साईनाथ आणि शक्ती देवेंद्र यांच्यासोबत बाईकने शिवाजी पार्कच्या दिशेने जात होते. रात्री दिड वाजता ते तिघेही गुरुनानक कॉलेज येथून जाताना त्यांना साईनाथचा परिचित गोलू हा मित्र भेटला. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. गोलूने साईनाथला हाक मारली आणि घरी येण्याची विनंती केली. मात्र त्याने त्याच्या घरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर ते तिघेही तेथून निघून गेले.

काही वेळानंतर त्यांच्या मागून गोलू आला आणि त्याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्याचा राग आल्याने त्याने त्याच्याकडील चाकूने साईनाथवर वार केले होते. त्यात त्याच्या डोक्याला, पाठीला दुखापत झाली होती. अचानक आरडाओरड सुरु झाल्याने स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी गोलूने स्थानिक रहिवाशांना कोणीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा गेम करण्याची धमकी दिली. मात्र स्थानिक रहिवाशांनी पोलिसांची धमकी देताच तो तेथून पळून गेला.

चाकू हल्ल्यात साईनाथ हा गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्यांनी त्याला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याची प्रकृती बिघडली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच ऍण्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी राज देवेंद्र या मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गोलूविरुद्ध आधी हत्येचा प्रयत्नाचा आणि नंतर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. क्षुल्लक कारणावरुन गोलूने त्याच्याच मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page