डॉक्टरची कार चोरी करुन पळून गेलेल्या चालकाला अटक

गुन्ह्यांच्या दिवसाच्या लोकेनमुळे सापडला आरोपी चालक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जून २०२६
मुंबई, – परळ येथील घरासमोरच पार्क केलेली मारुती व्हॅगनार कार चोरी करुन पळून गेलेल्या एका चालकाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली. गुन्ह्यांच्या दिवशी मिळालेल्या लोकेशनवरुन या चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून चोरीची कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. फैजान अबसार अहमद शेख असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

यातील तक्रारदार प्रतिक राजन मुणगेकर हे डॉक्टर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत परळ येथील डॉ. आंबेडकर रोड, इंडीया युनायटेड मिल्स चाळीत राहतात. गेल्या एक वर्षांपासून ते ठाण्यातील शादा एज्युकेशन सोसायटीमध्ये संचालक, नारायणगाव येथील माशेलकर स्वरुप स्पेश ऍण्ड रिसर्च सेंटरमध्ये अध्यक्ष म्हणून काम पाहतात. या दोन्ही संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी व्याख्याने आयोजित करण्यात येत होते, तिथे त्यांना जावे लागत असल्याने त्यांनी बँकेतून कर्ज घेऊन एक मारुती व्हॅगनार कार विकत घेतली होती. ३ जूनला ते कामानिमित्त पुणे येथे गेले होते. ८ जूनला ते पुण्यातून मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी त्यांची कार परळ येथील राहत्या घराजवळ पार्क केली होती.

१० जूनला रात्री साडेदहा वाजता ते कामावरुन घरी आले होते, यावेळी त्यांना त्यांची कार तिथे दिसली नाही. त्यांनी सर्वत्र कारचा शोध घेतला, मात्र त्यांना कुठेच कार दिसली होती. ही कार अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केल्याची खात्री होताच त्यांनी भोईवाडा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कारचोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासादरम्यान डॉ. प्रतिक मुणगेकर यांना कार चालविता येत नसल्याने ते ऑनलाईन चालक मागवत होते.

त्यामुळे गेल्या वर्षभरात त्यांच्याकडे चालक म्हणून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. तपासादरम्यान एका चालकाचे गुन्ह्यांच्या दिवशी लोकेशन परळ येथे असल्याचे दिसून आले. या चालकाची माहिती काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो उल्हासनगर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.

याच माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त अनुराग जैन, सहाय्यक पोलीस आयुक्त धनश्याम पंतगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ठाकूर, पोलीस निरीक्षक नितीन महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बोरसे, महादेव माळी, पोलीस हवालदार नितीन धंगेकर, पोलीस शिपाई जयदीप पाटील, हेमंत सुळे, पंकज रोकडे, गोविंद ठोके यांनी उल्हासनगर येथे साध्या वेषात पाळत ठेवून फैजान शेख याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली देताना चोरीची कार पोलिसांच्या स्वाधीन केली. फैजान हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सध्या उल्हासनगर येथे राहतो. तो चालक म्हणून काम करत असून त्याने यापूर्वी डॉ. प्रतिक मुणगेकर यांच्याकडे चालक म्हणून काम केले होते. गुन्ह्यांच्या दिवशी त्याचे लोकेशन परळ येथे सापडल्याने त्याला पकडण्यात पोलिसांना यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page