मयांक लोहार हत्येतील आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत आरोपी रिक्षाचालकासह सुरक्षारक्षकांशी वाद घालत होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ जून २०२६
मुंबई, – चर्चगेट-नालासोपारा उपनगरीय लोकलमध्ये मयांक रमेश लोहार या २२ वर्षांच्या तरुणाची हत्येप्रकरणी अटक केलेल्या रोशन बाबू सुवर्णा याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येतील चाकू आरोपीने फेंकून दिला असून हा चाकू हस्तगत करणे, तसेच चौकशीसाठी पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती, ही मागणी कोर्टाने मान्य करुन त्याल पोलीस कोठडी सुनावली आहे. रोशन हा रागीट स्वभावाचा असून त्याला मद्यप्राशन करण्याचे व्यसन होते. त्याचे अनेकदा सोसायटीच्या सुरक्षारक्षकासह रिक्षाचालकांशी वाद होत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजता नालासोपारा-चर्चगेट लोकलमध्ये प्रवास करणार्या मयांक आणि रोशन यांच्यात लोकलचा दरवाजा बंद करण्यावरुन वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात रोशनने मयांकची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. या हत्येनंतर तो बोरिवली रेल्वे स्थानक येताच पळून गेला होता. बोरिवली रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर तो रिक्षातून मिरारोड येथील त्याच्या घरी गेला आणि सकाळी पनवेलला त्याच्या नातेवाईकांकडे गेला होता. तेथून तो त्याच्या मंगलोर येथील गावी पळून जाणार होता. दुसरीकडे रक्तबंबाळ झालेल्या मयांकला रेल्वे पोलिसांनी शताब्दी हॉस्पिटलध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना रोशनला बुधवारी सकाळी नवी मुंबईतील पनवेल येथून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी गुन्ह्यांतील चाकू हस्तगत करणे बाकी असल्याचे सांगून आरोपीची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे असे सांगितले. त्यासाठी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी कोर्टात विनंती केली होती. यावेळी कोर्टाने रोशनला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या चौकशीत रोशन हा अविवाहीत असून तो मिरारोड येथील साईबाबानगर, मेघदूत टॉवरमध्ये त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. सुवर्णा कुटुंबिय मूळचे मंगलोरचे रहिवाशी आहेत. रोशन हा त्याचे वडिल बाबू सुवर्णासोबत बारकोड बनविण्याचे काम करत होता.
बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने शिक्षण सोडून दिले होते. त्याला क्षुल्लक कारणावरुन राग येत होता. विशेष म्हणजे त्याचे रागावर नियंत्रण नव्हते. त्यातच त्याला मद्यप्राशन करण्याचे व्यसन लागले होते. तो नियमित मद्यप्राशन करत होता. अनेकदा तो मद्यप्राशन करुन रिक्षाचालकासह सोसायटीच्या सुरक्षारक्षकांशी वाद घालत होता. गुन्ह्यांच्या दिवशी तो रात्री बारा ते साडेबारा वाजता घरी आला, यावेळी त्याच्या हातून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे याची पुसटशी कल्पना त्यांना नव्हती. काही वेळानंतर तो बॅग भरुन त्याच्या पनवेल येथील मामाच्या घरी गेला होता. दुसरीकडे रोशनचा शोध घेताना रेल्वे पोलिसांना तो रिक्षातून बसून मिरारोडच्या दिशेने गेल्याचे फुटेज प्राप्त झाले होते, या फुटेजवरुन रेल्वे पोलीस त्याच्या घरी पोहचले होते, त्याच्या वडिलांची चौकशी केल्यानंतर तो मंगलोरला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी पनवेल येथून रोशनला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने मयांकवर चाकूने हल्ला केल्याची कबुली दिली. हत्येनंतर त्याने चाकूने फेंकून दिला होता, तो चाकू कुठे फेंकून दिला याबाबत त्याला काहीही माहित नसल्याचे सांगितले. तपासात तो मदत करत नसल्याचा आरोप पोलिसांकडून कोर्टात करण्यात आला. चौकशीदरम्यान रोशनचा एक मित्र ऑनलाईन रिटेल ऍपसाठी काम करत असून तो परत आलेल्या वस्तू अतिरिक्त किंमतीत विक्री करत होता. त्याच्याकडूनच त्याने पन्नास रुपयांमध्ये चाकू विकत घेतला होता. तोच चाकू घरी घेऊन जाताना ही घटना घडल्याचे सांगितले. त्याच्या घराची झडतीत पोलिसांना चाकू कुठेच सापडला नाही. त्याच्याकडे एसी लोकलचा मासिक पास सापडला असून तो पास पोलिसांनी जप्त केला आहे.
लोकलमध्ये प्रवास करताना रात्री मुसळधार पाऊस पडत होता. यावेळी मयांक हा दरवाज्याजवळ उभा राहून प्रवास करत होता. यावेळी त्याला एका प्रवाशाने पावसाचे पाणी आत येत असल्याने दरवाजा बंद करण्यास सांगितले. मात्र रोशनने त्याला दरवाजा बंद करण्यास मनाई केली होती. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात रोशनने मयांकच्या पोटात आणि छातीत चाकूने भोसकल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. या प्रकाराने तिथे उपस्थित पोलिसांना धक्काच बसला होता. त्यात रोशनकडील चाकू पाहिल्यानंतर कोणीही प्रवाशी पुढे आले नाही.