मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ जून २०२६
मुंबई, – बोगस दस्तावेज बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच गेल्या वीस वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस कुलाबा पोलिसांनी अटक केली. सुदेश सुदेवन राघवन असे या ४६ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. २००६ साली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पळून गेला होता, अखेर वीस वर्षांनी त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सुदेश हा व्यावसायिक असून तो मिरारोड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळेसमोरील राज अटलॉटिक अपार्टमेंटमध्ये राहत होता. २००६ साली त्याच्याविरुद्ध कुलाबा पोलिसांनी बोगस दस्तावेज बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी एक टिम मिरारोड येथे गेली होती. यावेळी या टिमला सुदेश हा पळून गेल्याचे दिसून आले. गेल्या वीस वर्षांपासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. अलीकडे वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांनी विविध गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. याच दरम्यान सुदेशविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत त्याला २०२१ साली पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांत जामिन मिळताच तो पुन्हा पळून गेला होता. त्यामुळे या पथकाने संबंधित गुन्ह्यांची माहिती काढून त्याचा शोध सुरु केला होता. यावेळी सुदेश हा मिरारोड येथे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन तावरे, पोलीस हवालदार कुलकर्णी, तावडे, पोलीस शिपाई वैरागर, इंगवले, सचिन पाटील यांनी मिरारोड येथे साध्या वेशात पाळत ठेवून सुदेश राघवनला ताब्यात घेतले होते. चौकशीत तोच वीस वर्षांपासून फरार असल्याचा आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत अटक करुन लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.