भरवेगात जाणार्या बाईकच्या धडकेने ५० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू
अपघातानंतर आरोपी बाईकस्वाराचे घटनास्थळाहून पलायन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ जुलै २०२६
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका बाईकच्या धडकेने चिरनाथन आप्पाराव नावाच्या एका ५० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी बाईकस्वाराविरुद्ध सायन पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. अपघातानंतर आरोपी बाईकस्वाराने घटनास्थळाहून पलायन केले होते, त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
हा अपघात शुक्रवारी ३ जुलैला सकाळी सात ते साडेआठच्या सुमारास सायन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, गंगा विहार हॉटेलजवळील ठाण्याच्या दिशेने जाणार्या उत्तर वाहिनीवर झाला. नितीन आप्पासो माथने हे चुन्नाभट्टी येथे राहत असून सध्या माटुंगा वाहतूक पोलीस चौकीत पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. ३ जुलैला ते पोलीस शिपाई अविनाश पिंगळे यांच्यासोबत परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना शिवनेरी जाक्शन स्कॉय वॉकजवळ लोकांची गर्दी दिसून आली. घटनास्थळी गेल्यानंतर त्यांना एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली होती.
याच दरम्यान जखमी व्यक्तीला त्यांनी तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटमध्ये दाखल केले होते. तिथे त्याने त्याचे नाव चिरनाथन आप्पाराव असल्याचे सांगितले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तोपर्यंत तिथे सायन पोलिसांचे एक पथक आले होते. घडलेला प्रकार सायन पोलिसांना सांगून वाहतूक पोलीस निघून गेले होते. अतिदक्षता विभागात सुरु असतानाच रविवारी ५ जुलैला रात्री पावणेअकरा वाजता चिरनाथन याचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात घटनेच्या दिवशी चिरनाथन हे गंगा विहार हॉटेलजवळील ठाण्याच्या दिशेने जाणार्या वाहिनीवरुन पायी जात होते.
यावेळी दादरच्या दिशेने जाणार्या अज्ञात बाईकस्वाराने त्यांना धडक दिली होती. अपघातानंतर त्यांना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता आरोपी बाईकस्वार पळून गेला होता. अपघातात जखमी झालेल्या चिरनाथनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलीस हवालदार नितीन माथने यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात बाईकस्वाराविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून एका ५० वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.