सतरा वर्षांच्या अल्पवयीन प्रेयसीची २२ वर्षांच्या प्रियकराकडून हत्या
संशयासह लग्नासाठी होणार्या दबावाला कंटाळून हत्या केल्याचा संशय
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जुलै २०२६
मुंबई, – कांदिवलीतील एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन प्रेयसीची तिच्याच २२ वर्षांच्या प्रियकराने गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी प्रियकराला समतानगर पोलिसांनी काही तासांत अटक केली. सुरज मारुती वाघमारे असे या आरोपीचे नाव असून तो डिलीव्हरी बॉयचे काम करतो. प्रेयसीवर संशय घेऊन तिच्याकडून लग्नासाठी होणार्या दबावाला कंटाळून त्याने तिला भेटण्यासाठी बोलावून तिची हत्या करुन पलायन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने दामूनगर परिसरात प्रचंड शोककळा पसरली होती.
ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता कांदिवलीतील दामूनगर परिसरातील डोंगराळ भागात घडली. सकाळी साडेअकरा वाजता एका पादचार्याला एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने ही माहिती समतानगर पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांच्यासह समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. तिच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या अनेक जखमा होत्या. त्यामुळे तिची अज्ञात व्यक्तीने हत्या करुन पलायन केल्याचे उघडकीस आले होते. तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या झालेल्या हत्येच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत समतानगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तपासाठी समतानगर पोलिसांचे दोन ते तीन विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक अजीतसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गंगापूरकर, योगेश रामेकर, योगेश राऊत, स्वप्नील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात, सागर देवरुखे, अंकुश गायकवाड, भीमेश कोटला, सुषमा गरड, युवराज टेकवडे, प्राजक्ता फड, समाधान माळी, पोलीस अंमलदार तोंडवळकर, पोलीस हवालदार किणी, ननावरे, भिकले, शिंदे, सपकाळे, रेड्डी आदी पथकाने तपासाला सुरुवात केली होती. घटनास्थळी पोलिसांना एक नोटबुक सापडली होती. त्यात एका कॉलेजची प्रश्नपत्रिका होती. हाच धागा पकडून पोलिसांनी कॉलेजमध्ये जाऊन शुक्रवारी कोणी विद्यार्थिनी कॉलेजमध्ये आली नाही याबाबत विचारणा केली होती. यावेळी एक तरुणी कॉलेजमध्ये आली नसल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
तिचा घरचा पत्ता घेतल्यानंतर पोलीस पथक तिच्या घरी रवाना झाले होते. यावेळी तिच्या पालकांच्या चौकशीनंतर त्यांची मुलगी गुरुवारी सकाळी अकरा वाजता नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी गेली, मात्र ती सायंकाळपर्यंत घरी आली नव्हती. तिचे सुरज वाघमारे याच्याशी प्रेमसंबंध होते, ही माहिती त्यांना माहिती होती. त्यामुळे तिचे पालक सुरज राहत असलेल्या कांदिवलीतील दामूनगर, लहूगढच्या सरस्वती चाळीतील रुममध्ये गेले. तिथे त्यांना सुरज भेटला, मात्र गुरुवारी तो तिला भेटलाच नाही असे सांगितले. इतकेच नव्हे तर तिचा शोध घेत असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. ही माहिती पालकांकडून प्राप्त होताच पोलिसांनी मृत तरुणीचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन, डिजीटल पुरावे तसेच तांत्रिक माहितीवरुन सुरजचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या पथकाने काही तासांत सुरजला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
सुरुवातीला त्याने या हत्येशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसी इंगा दाखविताच त्याने त्याच्या अल्पवयीन प्रेयसीचीहत्या केल्याची कबुली दिली. त्याची प्रेयसी तिच्या पालकांसोबत कांदिवली परिसरात राहत होती. सध्या ती एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. कॉलेजमध्ये तिचे काही मित्र-मेैत्रिणी झाले होते, त्यांचा एक ग्रुप होता. या ग्रुपमध्ये ती सक्रिय होती. तिचे अनेक तरुणासोबत चांगले संबंध होते. तिच्या मनमिळावू स्वभावामुळे ती सर्वांची लाडकी होती. तिचे सुरज वाघमारे याच्याशी प्रेमसंबंध होते. तो विजय सेल्समध्ये डिलीव्हरीचे काम करत होता. त्याला तिच्या मित्रांच्या ग्रुपबाबत राग होता. तो तिच्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात खटके उडत होते. त्यात तिच्याकडून सुरजला लग्नाविषयी सतत विचारणा होत होती. त्याला तो कंटाळून गेला होता. त्यातून त्याने तिच्या हत्येची योजना बनविली होती.
ठरल्याप्रमाणे त्याने तिला गुरुवारी दामूनगरातील डोंगराळ भागात भेटण्यासाठी बोलाविले होते. यावेळी त्याने त्याच्यासोबत बिर्यानी आणली होती. कॉलेजमध्ये सुटल्यानंतर ती घरी न जाता सुरजला भेटणयासाठी डोंगराळ भागात आली होती. तिथे काही तास टाईमपास केल्यानंतर दोघांनी जेवण घेतले होते. दुपारी तीन वाजता त्याने तिची गळ्यावर बाराहून अधिक वार करुन तिची हत्या केली. तिचा मोबाईल स्विच ऑफ करुन तिची बॅग घेऊन तो घरी निघून आला होता.
सायंकाळी तिचे पालक घरी आल्यानंतर त्याने तिचा शोध घेतल्याचे दिखावा केला. मात्र घटनास्थळी मिळालेल्या नोटबुकवरुन मृत तरुणीची ओळख पटली आणि या हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शनिवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक अजीतसिंग राजपूत यांनी सांगितले.