कॉपर केबलची टिप देणारा एमटीएनएलचा क्लार्क गजाआड

आर्थिक मोबदल्यासाठी आरोपींना माहिती देत असल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जुलै २०२६
मुंबई, – महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या कॉपर केबलची आरोपींना टिप देणारा दुसरा तिसरा कोणी नसून महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचा एक क्लार्क असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तपासात आलेल्या या माहितीनंतर विनोद फुंदन यादव याला गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली असून तो सध्या कांदिवलीतील एमटीएनएल कार्यालयात क्लार्क म्हणून काम करतो. आर्थिक मोबदल्यासाठी त्याने यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना मदत केली होती, त्यांना चोरी कुठे करायची ती जागा दाखविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

एमटीएनएलच्या वाढत्या कॉपर केबल चोरीच्या घटनेनंतर वरिष्ठांनी सर्वच पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अशा आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना ३० जून २०२६ रोजी बोरिवलीतील वसंत मारवल रोड, क्लिरिऑन इमारतीसमोरील मागाठाणे टेलिफोन एक्सचेंजवळ काहीजण एमटीएनएलच्या कॉपर केबल वायर चोरीसाठी येणार असल्याची माहिती युनिट दहाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे, प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल राजे यांच्यसह त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, पोलीस उपनिरीक संदेश इंगळे, पोलीस अंमलदार रामकिशन मोरे, धनंजय जाधव, चंद्रशेखर डफळे, अशोक परब, अनिकेत निकम, सुधाकर निर्मळे यांनी तिथे साध्या वेशात गस्त सुरु केली होती.

ही गस्त सुरु असतानाच पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. या आरोपींमध्ये साहिल शकील साह, अब्दुल सिद्धीक अहमद शेख, रिझवान मेहताब मलिक आणि मोहम्मद अफजल हसन खान यांचा समावेश होता. या कारवाईत पोलिसांनी ३९ लाख ४० हजार रुपयांचे दोन हजार पेअरचे ९८५ मीटर कॉपर केबल वायर, प्रत्येकी दहा लाखांचे दोन बोलेरो पिकअप वाहन, ४० लाखांची जेसीबी, मोबाईल असा १ कोटी पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि दूरसंचार अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यातील अब्दुल शेख आणि मोहम्मद अफजल खान हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध कांदिवली आणि नवघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

त्यांच्या चौकशीत त्यांना महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचा एक कर्मचारी मदत करत होता. मेट्रोसह खोदकाम करताना कुठल्या कॉपर केबलचे नुकसान झाले आहे, त्या जागेची पाहणी करुन आरोपींना घटनास्थळी बोलावून त्या ठिकाणाची कॉपर केबलची चोरी करण्यास सांगत होता. विनोद यादव असे या कर्मचार्‍याचे नाव असून तो सध्या कांदिवलीतील महानगर टेलिफोन निगम कार्यालयात क्लार्क म्हणून काम करत होता. आरोपींना मदत करुन त्याने त्यांच्याकडून लाखो रुपयांचा आर्थिक मोबदला घेतला होता. तपासात आलेल्या माहितीनंतर विनोद यादवची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करुन त्याला शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावलली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page