वीस लाखांच्या घरफोडीच्या दोन गुन्ह्यांतील त्रिकुटास अटक

बांगुरनगर पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीचा पर्दाफाश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२६
मुंबई, – मालाड परिसरातील दोन वेगवेगळ्या घरफोडीप्रकरणी एका त्रिकुटास बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. शब्बीर सलीम खान, मोहम्मद आतिक आदिल खान, मुस्तफा इसा सिद्धीकी ऊर्फ भुवर अशी या तिघांची नावे आहेत.या तिघांच्या अटकेने घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्या आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने घरफोडीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गोरेगाव येथील न्यू लिंक रोड, शहिद भगतसिंग नगर, गोरेगाव बस डेपोजवळील लोकसेवा चाळीत ५३ वर्षांचे मारुती कैराप्पा कांबळे हे त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत राहतात. ते बेस्टमध्ये चालक म्हणून काम करत असून सध्या त्यांची नेमणूक गोरेगाव बस डेपोमध्ये आहे. सोमवार ११ मे २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता ते नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले होते. रात्री आठ वाजता ड्यूटी संपल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांना त्यांची पत्नी रंजना कांबळे हिचा कॉल आला होता. तिने त्यांच्या घरी चोरी झाली असून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन सुमारे वीस लाखांचे विविध सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले.

त्यांची पत्नी सायंकाळी योगा क्लासला गेली होती. यावेळी घरात कोणीही नव्हते. याच संधीचा फायदा घेऊन त्यांच्या घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने रुमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर कपाटातील विविध सोन्याचे दागिने व तीस हजाराची कॅश सुमारे वीस लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बांगुरनगर पोलिसांना ही माहिती दिली होती.

ही घटना ताजी असताना १५ जुलै २०२६ रोजी मालाड येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम गार्डन इंटरफेस इमारतीजवळील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने कार्यालयात प्रवेश करुन तीस हजार रुपयांचे दोन एसी चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी शब्बीर खान, मोहम्मद आतिक खान आणि मुस्तफा सिद्धीकी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यांनीच मारुती कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करुन वीस लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता. त्यानंतर शब्बीरने महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळात चोरीची कबुली दिली. या दोन्ही गुन्ह्यंतील चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत करण्यात येणार आहे. त्यांच्या अटकेने दोन गुन्ह्यांची उकल झाली असून इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page