चारकोप मार्केटमधील छत्री चोराला चोरीच्या मुद्देमालासह अटक

आरोपीकडून पंधरा हजाराच्या पन्नास छत्री जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२६
मुंबई, – कांदिवलीतील चारकोप मार्केटमध्ये एका शॉपमधून छत्री चोरी करुन पळून गेलेल्या आरोपीस चारकोप पोलिसांनी अटक केली. संतोष शंकर आदिद्राविडर असे या २० वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी पंधरा हजार रुपयांचे पन्नास चोरीचे छत्री जप्त केल्या आहेत. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने गुरुवार ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

करसण देवजी वाण हे कांदिवलीतील चारकोप, सेक्टर पाच, निलम सोसायटीमध्ये राहतात. त्यांच्या मालकीचे चारकोप मार्केटमध्ये ऍपल कलेक्शन नावाचे एक शॉप आहे. १६ जुलैला त्यांच्या शॉपमध्ये चोरी झाली होती. अज्ञात व्यक्तीने शॉपमध्ये प्रवेश करुन सुमारे पंधरा हजार रुपयांचे पन्नास छत्री चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार दुसर्‍या दिवशी उघडकीस येताच त्यांनी चारकोप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू थोरात यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी संतोष आदिद्राविडर या तरुणाला ताब्यात घेतले.

चौकशीत त्यानेच ऍपल कलेक्शन शॉपमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे सर्व छत्री पोलिसांनी जप्त केल्या आहेत. संतोष हा कांदिवलीतील चारकोप, भाब्रेकरनगर, ज्ञानदर्शन अपार्टमेंटमध्ये राहतो. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चारकोप मार्केटमध्ये अशा प्रकारे चोरीची घटना झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page