पार्क केलेल्या इलेक्ट्रीक बाईक चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चोरीच्या अकरा बाईकसह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० जुलै २०२६
मुंबई, – विविध ठिकाणी पार्क केलेल्या इलेक्ट्रीक बाईकला टार्गेट करुन रात्रीच्या वेळेस बाईक चोरी करणार्‍या एका टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. मोहसीन अकबरअली मालतबडे आणि अरफात हाफीज शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही कुर्ला व जोगेश्‍वरीतील रहिवाशी आहे. या दोघांकडून पोलिसांनी अकरा चोरीच्या इलेक्ट्रीक बाईक जप्त केल्या असून त्याची किंमत सहा लाख अठरा हजार रुपये इतकी आहे. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

वैभव सुनिल गुप्ता हा तरुण एका पिझ्झा शॉपमध्ये कामाला आहे. त्याच्या मालकीची एक इलेक्ट्रीक बाईक आहे. २० जुलैला त्याने त्याची बाईक अंधेरीतील एमआयडीसी, ओपस सेंटरच्या शॉपसमोर पार्क केली होती. रात्री उशिरा ही बाईक अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार दुसर्‍या दिवशी उघडकीस आल्यानंतर त्याने एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बाईक चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही वर्षांत मुंबई शहरातून विविध ठिकाणाहून पार्क केलेल्या इलेक्ट्रीक बाईक चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा गुन्हेगारांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी झोनमधील सर्वच पोलीस ठाण्यांना दिले होते.

या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनश्याम नायर, पोलीस निरीक्षक सुनिल करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पर्बत, पोलीस शिपाई जाधव, लोखंडे, अवघडे, कदम, पवार, विशाल पिसाळ आदी पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील पन्नास ते साठ सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहसीन आणि नंतर अरफात या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत ते दोघेही इलेक्ट्रीक बाईक चोरी करणार्‍या सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले.

त्यांनी मुंबई सेंट्रल, चर्नीरोड, विक्रोळी, दादर, अंधेरी, वाकोला, वरळी अशा वेगवेगळ्या परिसरातून इलेक्ट्रीक बाईक चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी सहा लाख अठरा हजार रुपयांचे अकराहून अधिक चोरीच्या इलेक्ट्रीक बाईक जप्त केल्या आहेत. त्यांच्या अटकेने एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोघांनी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणाहून इलेक्ट्रीक बाईकची चोरी केल्यानंतर त्यांचा ताबा लवकरच इतर पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page