हत्येसह गँगरेपच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक
गेल्या तेरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
वसई, – हत्येसह गँगरेपच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अक्रम रियासतअली खान ऊर्फ शेख असे या आरोपीचे नाव असून गेल्या तेरा वर्षांपासून तो मुंबईसह ठाणे ग्रामीण पोलिसांना सतत गुंगारा देत होता. अखेर तेरा वर्षांनी त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी वालिव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या दरम्यान त्याने इतर कुठले गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
अक्रम शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध वालिव पोलीस ठाण्यात हत्येसह गंभीर दुखापत तसेच निर्मलनगर पोलीस ठाण्यात गँगरेपच्या गुन्ह्यांची नोंद होती. याच गुन्ह्यांत तो गेल्या तेरा वर्षांपासून वॉण्टेड होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी अनेकदा फिल्डींग लावली होती, मात्र प्रत्येक वेळेस तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात होता. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना अक्रम हा मुंब्रा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविंद केंद्र, अकील सुतार यांनी मुंब्रा येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत वॉण्टेड असलेला तोच अक्रम शेख असल्याचे उघडकीस आले. अक्रम हा मूळचा उत्तरप्रदेशच्या बस्ती, रुघौलीचा रहिवाशी असून सध्या तो मुंब्रा येथील शिळफाटा, आचार गल्ली, ग्रीन हाईट इमारतीच्या ए विंगच्या फ्लॅट क्रमांक ७०५ मध्ये राहत होता.
२२ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याने नालासोपारा येथील रशीद कंपाऊंड, गांगडीपाडा, धानिकबाग परिसरात एका व्यक्तीला चोर समजून बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने मृत व्यक्तीला नग्न अवस्थेत टाकून, हत्येचा पुरावा नष्ट करुन पलायन केले होते. याप्रकरणी वालिव पोलिसांनी ३०२, २०१, १४३, १४७, १४८, १४९ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. दुसरा गुन्हा १० सप्टेंबर २०१५ रोजी निर्मलनगर पोलीस ठाण्यात घडला होता. या गुन्ह्यांत त्याने एका मुलीचे रिक्षातून अपहरण केले होते. तिला घाटकोपर आणि नंतर नालासोपारा येथे आणून त्याच्यासह त्याच्या मित्रांनी सामूहिक लैगिंक अत्याचार केला होता. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी ३७६ (ड), ३६६, ३४१, ५०६, ५०२ (२), ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होत. तिसरा गुन्हा नालासोपारा येथील धानीवबाग परिसरात घडला होता. यातील तक्रारदारांनी त्याला न विचारता त्याच्या घरात भाडेकरु ठेवला म्हणून त्याने त्यांना बेदम मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध वालिव पोलिसांनी ३२६, ३२५, ४२७, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तिन्ही गुन्ह्यांत अक्रम शेख याचा सहभाग होता. या गुन्ह्यांतील तो मुख्य आरोपी होता. मात्र गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. गेल्या तेरा वर्षांपासून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु केला होता. अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. याच गुन्ह्यांत तो सध्या वालिव पोलिसांच्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक नितीन विचारे, सहाय्यक फौजदार श्रीमंत जेधे, पोलीस हवालदार मनोहर तावरे, आसिफ मुल्ला, संतोष मदने, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, अकील सुमार, प्रविणराज पवार, राजवीर संधू, सतीश जगताप, अनिल नांगरे, राजाराम काळे, महेश वेल्हे, संग्राम गायकवाड, हनुमंत सूर्यवंशी, पोलीस शिपाई नितीन राठोड, साकेत माघाडे, अंगद मुळे, मसुब, सचिन चोधरी, सायबर सेलचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण यांनी केली.