मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मार्च २०२४
मुंबई, – तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करुन फसवणुकीच्या उद्देशाने विविध बँक खात्यात २५ बँक खाते उघडविण्यात आले असून तीन गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले आहे, ही कारवाई थांबविण्यासाठी पैशांची मागणी करुन एका ७१ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची अज्ञात व्यक्तीने १ लाख ९४ हजाराची फसवणुक केल्याची धक्कादायक घटना माहीम परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी फसवुणकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
७१ वर्षांच्या विजया परमेश्वरम लक्ष्मी ही महिला माहीम परिसरात एकटीच राहते. ती सेवानिवृत्त असून तिचे एका खाजगी बँकेत खाते आहे. २० एप्रिलला ती तिच्या घरी होती. यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. त्याने तिच्या आधारकार्डचा कोणीतरी गैरवापर करुन विविध बँक खात्यात २५ हून अधिक बँक उघडले आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यानंतर त्याने तिच्या बँक खात्याची माहिती मागून तिला सर्व पैसे त्याने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले, मात्र तिने पैसे ट्रान्स्फर करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने तिला वीस लाखांचा दंड आणि सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते असे सांगून तिच्याविरुद्ध ईडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच तिच्याविरुद्ध अटक वॉरंट निघणार आहे, तिला अटक होणार अशी धमकी दिली. ही कारवाई थांबवावी असे वाटत असल्यास काही पैसे पाठवून द्या असे सांगितले. त्यामुळे भीतीपोटी तिने त्याला वेगवेगळ्या बँक खात्यात १ लाख ९४ हजार रुपये पाठवून दिले होते. ही माहिती कोणालाही सांगू नका असेही त्याने सांगितले होते.
याच दरम्यान तिचा जावई कार्तिक नारायण यांचा तिला कॉल आला होता. तिने त्याला घडलेला प्रकार सांगितला. त्याने तिला हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे आता कुठल्याही बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करु नका असे सांगितले. त्यानंतर त्यांनी १९३० या सायबर सेलच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तिथे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर ते माहीम पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी तिथे घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर माहीम पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.