जिवंत पतीचा मृत्यूचा दाखला सादर करुन फ्लॅटची विक्री करुन फसवणुक
फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपी पत्नीला अटक व कोठडी
अरुण सावरटकर
९ सप्टेंबर २०२६
मुंबई, – सोसायटीची बोगस एनओसीसह जिवंत पतीचा मृत्यूचा दाखला सादर करुन संयुक्त नावावर असलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन पतीच्या पन्नास टक्के हिस्स्याचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी आरोपी पत्नीला एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. शालिनी डाइना रायन अपेलिन क्रास्टा असे या आरोपी पत्नीचे नाव असून अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जुलै महिन्यांत शालिनीविरुद्ध तिच्याच पतीने बोगस दस्तावेज बनवून फ्लॅटची विक्री करुन फसवणुक केल्याप्रकरणी एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
रायन अपेलिन आलबन क्रास्टा हे त्यांच्या वयोवृद्ध आई लिलासोबत वांद्रे परिसरात राहत असून कुलाबा येथील ताज हॉटेलमध्ये गेल्या २९ वर्षांपासून सिनिअर शिफ्ट ऑपरेटर म्हणून करतात. शालिनी ही त्यांची पत्नी असून १४ एप्रिल २००७ रोजी त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर ते बोरिवलीतील मेरी इम्युक्युलेट शाळेसमोरील राज व्हिला सहकारी सोसायटीच्या बी/१०७ मध्ये राहत होते. हा फ्लॅट त्यांनी प्रमा नारायण राव यांच्यासह इतर चौघांकडून ७३ लाख ८० हजारांमध्ये विकत घेतला होता. फ्लॅटचे कायदेशीर रजिस्टेशन त्यांच्यासह पत्नीच्या नावावर करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी एका खाजगी बँकेतून ५६ लाखांचे कर्ज घेतले होते. त्याचे नियमित हप्ते ते स्वत भरत होते.
काही वर्षांपूर्वी त्यांचे शालिनीसोबत कौटुंबिक वाद सुरु झाला होता. या वादानंतर त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. ऑक्टोंबर २०२३ रोजी त्यांनी वांद्रे येथील फॅमिली कोर्टात संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. ते प्रकरण सध्या कोर्टात प्रलंबित आहे. या घटनेनंतर ते त्यांच्या वयोवृद्ध आईसोबत वांद्रे येथे राहण्यासाठी आले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा मित्र प्रसाद पताडे यांच्याकडे बँकेचा एक प्रतिनिधी आला होता. त्याने त्यांच्या फ्लॅटची विक्री धर्मेश जगदीश तन्ना आणि धारा धर्मेश तन्ना यांना विक्री करण्यात आला असून त्यासाठी त्यांना बँकेने एक कोटी अकरा लाखांचे गृहकर्ज दिले आहे.
हा प्रकार प्रसाद पताडे यांच्याकडून समजताच ते बँकेत विचारणा करण्यासाठी गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना बँक अधिकार्यांनी फ्लॅटची विक्री त्यांच पत्नी शालिनी क्रास्टा हिने केली आहे. त्यासाठी तिने सोसायटीचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले होते. त्या प्रमाणपत्राची शहानिशा केल्यानंतर त्यांना शालिनीला सोसायटीच्या कमिटीने प्रमाणपत्र दिले नसल्याचे समजले. कमिटीच्या अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदारांची बोगस स्वाक्षरी करुन तिने ते प्रमाणपत्र घेऊन बँकेत सादर केले होते. इतकेच नव्हे तर रायन क्रास्टा हे जिवंत असताना त्यांच्या पत्नीने ते मयत झाल्याचे सांगून त्यांच्या नावाने बोगस मृत्यूचा दाखला सादर केला होता.
या फ्लॅटमध्ये ती कायदेशीर वारसदार दाखवून तिने फ्लॅटची परस्पर विक्री केली होती. बोरिवलीतील फ्लॅट रायन आणि शालिनी यांच्या संयुक्त नावावर होता. तरीही तिने रायन यांचा मृत्यू झाला असून त्यांची वारसदार म्हणून बँकेत बोगस दस्तावेज सादर केले होते. त्यानंतर तिने फ्लॅटची तन्ना कुटुंबियांना परस्पर विक्री करुन त्यांच्या हिस्स्यातील पन्नास टक्क्यांचा अपहार केला होता. या फ्लॅटसाठी तिने तन्ना कुटुंबियांकडून गृहकर्जाचे एक कोटी अकरा लाख रुपयाची रक्कम घेऊन त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले होते.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्यांची पत्नी शालिनी क्रास्टा हिच्याविरुद्ध एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शालिनीविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फ्लॅटची परस्पर विक्री करुन स्वतच्याच पतीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिची पोलिसांकडून चौकशी सुरु होती.
ही चौकशी सुरु असताना तिला सोमवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. शालिनीला सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्रासह पतीच्या मृत्यूचा दाखला कोणी बनवून दिला, तिने फसवणुक केलेली कुठे गुंतवणुक केली, त्याची कशा प्रकारे विल्हेवाट लावली याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.