नोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा घालणार्या टोळीचा पर्दाफाश
मुंबईसह बिहार, हरियाणातून पळून गेलेल्या तीन आरोपींना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० सप्टेंबर २०२६
मुंबई, – नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणांना गंडा घालणार्या एका टोळीचा पायधुनी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत तीन आरोपींना मुंबईसह बिहार आणि हरियाणा येथून पोलिसांनी अटक केली. तबरेज आलम अन्सारी, मोहम्मद शमीम अन्सारी आणि व्यकंटेश गंगय्या चकल अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी पन्नास भारतीय पासपोर्ट, सहा संगणक, लॅपटॉप, नऊ मोबाईल, तेरा चेकबुक, डेबीट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड आणि वोटींग कार्ड, दोन बोगस नेमणूक पत्र आदी मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने आतापर्यंत पन्नासहून अधिक बेरोजगार तरुणांना नोकरीच्या नावाने गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गेल्या काही वर्षांत विदेशात नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणांची फसवणुक करणार्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. त्यापैकी एक टोळी मशिदबंदर परिसरात कार्यरत होती. या टोळीने अल शिफा ट्रॅव्हेल्स नावाचे एक बोगस कंपनीचे कार्यालय सुरु करुन अनेकांना विदेशात नोकरीची संधी असल्याची जाहिरात केली होती. या जाहिरातीला भुलून तसेच विदेशात नोकरीची इच्छा असलेल्या अनेक बेरोजगार तरुणांनी त्यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जासोबत त्यांचे भारतीय पासपोर्टसह इतर दस्तावेज जमा करुन प्रत्येकी पंधरा हजार रुपये भरले होते. काही दिवसांनी त्यांना नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र देण्यात आले होते. मात्र ते नियुक्तीपत्र बोगस असल्याचे अनेकांना लक्षात आले होते.
आरोपींनी नोकरीच्या आमिषाने त्यांच्याकडून पैसे घेतले होते, त्यांना नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीनंतर आरोपींनी कंपनीच्या कार्यालयाला टाळे लावून पलायन केले होते. हा प्रकार नंतर संबंधित बेरोजगार तरुणांच्या लक्षात आला होता. त्यामुळे त्यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचार्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पायधुनी पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध बोगस नियुक्तीपत्र देऊन नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या तक्रारीची पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांनी गंभीर दखल घेत पायधुनी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. तपासात गुन्ह्यांतील आरोपी मुंबईतून पळून गेल्याचे उघडकीस आले होते.
या माहितीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बुवा, पोलीस निरीक्षक अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद फड, सहाय्यक फौजदार रज्जाक शेख, पोलीस हवालदार घोडे, पवार, पोलीस शिपाई इतापे, पाटील, तुडीवाले, कुबेर काळेल, पाटील, कदम, आणि जगदेव आदी पथकाने तबरेज अन्सारी याला हरियाणा, मोहम्मद शमीम याला बिहार तर व्यकंटेश चकल याला टेककर स्ट्रिट येथून अटक केली. चौकशीत त्यांनी आतापर्यंत दहाजणांची फसवणुक केल्याची कबुली दिली आहे. मात्र त्यांनी ५० पेक्षा अधिक लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.