म्हाडा फ्लॅटच्या नावाने महिलेला २९ लाखांना गंडा

महिलेसह चौघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ सप्टेंबर २०२६
मुंबई, – म्हाडाच्या लॉटरीमध्ये लागलेला फ्लॅट नावावर करुन देण्यचे आमिष दाखवून एका महिलेची चारजणांच्या टोळीने सुमारे २९ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. सुशात जाधव, विलास जाधव, राखी भोसले आणि नितीन पवार अशी या चौघांची नावे असून या चौघांना लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

३५ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पती आणि मुलासोबत अंधेरी परिसरात राहते. तिच्यासह तिचे पती खाजगी कंपनीत कामाला आहे. २०२३ साली त्यांनी फ्लॅटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांना सातारा येथील रहिवाशी असलेले अमोल चिकणे याने त्यांना म्हाडा लॉटरीमध्ये एक फ्लॅट लागला होता. मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी त्यांना पैसे भरण्याची विनंती केली होती. काही महिन्यानंतर त्याने ती डिल कॅन्सल करुन तोच आता फ्लॅट घेणार असल्याचे सांगितले.

याच दरम्यान त्यांची अमोलमार्फत सुशांत जाधव या इस्टेट एजंटशी ओळख झाली होती. नोव्हेंबर २०२३ रोजी ती तिच्या पतीसोबत गोरेगाव येथे गेली होती. तिथेच त्यांची सुशांत जाधव आणि विलास जाधवची भेट झाली होती. त्यांनी गोरेगाव येथील प्रेमनगर, स्वराज कॉम्प्लेक्स, ३/ई/२०४ क्रमांकाचा फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. हा फ्लॅट राखी भोसले हिच्या मालकीचा असून तिला म्हाडा लॉटरीमध्ये फ्लॅट मिळाला होता. त्यांनी तिला म्हाडाच्या खात्यात पैसे भरुन तो फ्लॅट त्यांच्या नावावर करुन देण्याचे आश्‍वासन दिले होते.

दुसरीकडे त्यांनी राखीसोबत फ्लॅटचा ४३ लाखांमध्ये खरेदी-विक्रीचा सौदा केला होता. तिच्याशी सविस्तर चर्चा करुन त्यांनी राखी भोसलेच्या नावाने म्हाडाच्या बँक खात्यात ३२ लाख ४२ हजार २३३ रुपये ट्रान्स्फर केले तर उर्वरित पपाच लाख रुपये कॅश स्वरुपात दिले होते. फ्लॅटचा संपूर्ण पेमेंट करुनही त्यांनी फ्लॅटचे कागदपत्रे त्यांच्या नावावर करुन दिले नाही, फ्लॅटचा ताबा दिला नाही. चौकशीदरम्यान या आरोपींनी याच फ्लॅटची परस्पर दुसर्‍या व्यक्तीला विक्री करुन तिची फसवणुक केली होती.

त्यामुळे तिने त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. त्यानंतर त्यांनी तिला आठ लाख रुपये परत केले, मात्र २९ लाख ४२ हजार २३३ रुपये परत न करता तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने चारही आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुशांत जाधव, विलास जाधव, राखी भोसले आणि नितीन पवार या चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या चारही आरोपींना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page