३४ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक

शॉपचे बोगस दस्तावेज बनवून खरेदी-विक्रीचा व्यवहार केला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ सप्टेंबर २०२६
मुंबई, – सुमारे ३४ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी विरम मगनभाई देसाई नावाच्या एका आरोपीस तीन महिन्यानंतर दहिसर पोलिसांनी अटक केली. शॉपचे बोगस दस्तावेज बनवून खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन तक्रारदार व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याच गुन्ह्यांत इतर चारजण सहआरोपी असून त्यात कन्नूभाई पांचाळ, हिराबेन पांचाळ, राकेश पांचाळ आणि विष्णू देसाई यांचा समावेश आहे. अटकेनंतर विरमला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

५८ वर्षांचे तक्रारदार बोरिवली येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून दहिसर येथील गणेशनगर परिसरात त्यांचा घड्याळ रिपेरिंगचा व्यवसाय आहे. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी एका शॉपची गरज होती. याच दरम्यान त्यांना त्यांच्या मित्राने गणेशनगर परिसरात एक शॉप विक्रीसाठी उपलब्ध असल्यााचे सांगितले होते. काही दिवसांनी त्याने त्यांची कन्नूभाई पांचाळसह इतर आरोपीशी ओळख करुन दिली होती. त्याने त्यांना एक शॉप दाखविले होते, त्यात तीन रुम होते, या शॉपची भाडेपावतीसह इतर दस्तावेज होते. त्यामुळे त्यांनी तोच शॉप खरेदीचा निर्णय घेतला होता.

ठरल्याप्रमाणे त्यांच्यात शॉपचा खरेदी-विक्रीचा ४० लाखांमध्ये सौदा झाला होता. यावेळी त्यांच्यात एक करार झाला होता. करारानंतर त्यांनी त्यांना टप्याटप्याने ३४ लाख ३५ हजार रुपयांचे पेमेंट दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी शॉपचे मूळ दस्तावेज तसेच शॉपचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा करुन ते सर्वजण त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याची शहानिशा केली होती. त्यात तो शॉप मगनभाई देसाई याच्या मालकीचा होता.

आरोपींनी तो शॉप त्यांच्या नाावावर असल्याचे बोगस दस्तावेज बनवून त्यांच्यासोबत शॉपचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला. त्यांच्याकडून शॉपसाठी ३४ लाख ३५ हजार रुपये घेऊन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी संबंधित पाचही आरोपीविरुद्ध दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कन्नूभाई तुळशीदास पांचाळ, हिराबेन कन्नूभाई पांचाळ, राकेश कन्नूभाई पांचाळ, विष्णू मगनभाई देसाई आणि विरम देसाई याच्याविरुद्ध शॉपचे बोगस दस्तावेज बनवून शॉपचा ३४ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल होताच आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या विरम देसाई याला पोलिसांनी अटक केली. या कटात विरमने आर्थिक व्यवहारासह बोगस दस्तावेज बनविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे उघडकीस आले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page