मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपूत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असलेल्या अमेंद्रर अशोककुमार मिश्रा याला मंगळवारी किल्ला न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अमेंदर हा आरोपी मॉरीस नोरोन्हा ऊर्फ मॉरीसभाई याचा बॉडीगार्ड असून त्याच्याच पिस्तूलमधून मॉरीसने आधी अभिषेकची हत्या केली आणि नंतर स्वतवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यामुळे याच गुन्ह्यांत अमेंदरला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली.
विनोद घोसाळकर हे माजी नगरसेवक असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत. मॉरीस हा त्यांचा मित्र असून गेल्याच आठवड्यात मॉरीससोबत वाद मिटविण्यासाठी ते त्याच्या कार्यालयात गेले होते. फेसबुक लाईव्हवर त्यांनी त्यांच्यातील वाद मिटविल्याचे जाहीर केले होते. याच दरम्यान मॉरीसने त्याच्याकडील पिस्तूलमधून गोळ्या झाडून विनोद घोसाळकर यांची हत्या केली होती. या हत्येनंतर त्याने त्याच्याच कार्यालयात स्वतवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या गोळीबाराच्या घटनेची वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला होता. हा तपास हाती येताच पोलिसांनी तपास करुन मॉरीसचा बॉडीगार्डला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत ज्या पिस्तूलमधून मॉरीसने विनोद घोसाळकर यांची हत्या करुन नंतर आत्महत्या केली, ती पिस्तूल अमेंदरची होती. त्याचा त्याच्याकडे लायसन्स होते, मात्र उत्तरप्रदेशातून पिस्तूल आणल्यानंतर त्याचे मुंबईत नूतनीकरण करणे तसेच पोलिसांना पिस्तूल असल्याची माहिती आवश्यक होते. ती माहिती अमेंदरने दिली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर आर्म्स ऍक्टतर्ंगत गुन्हा नोंदवून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला मंगळवारी १३ फेब्रुवारीला दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या वतीने अमेंदरच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. कट शोधण्यासाठी पुढील तपास बाकी आहे, या गुन्ह्यांत तो लाभार्थी आहे का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा तपास करण्यासाठी आणखीन पोलीस कोठडीची आवश्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र अमेंदरच्या वकिलांनी त्याला आक्षेप घेत पोलीस कोठडीत असताना अमेंदरने त्याच्याकडील सर्व माहिती पोलिसांना दिली आहे. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणे चुकीचे असल्याचे सांगून त्याला न्यायालयीन कोठडी मिळावी अशी विनंती केली होती. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर अमेंदरला २६ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. गुन्ह्यांच्या घटनास्थळाहून पोलिसांनी सहा रिकाम्या पुंगळ्या, पाच मोबाईल, आठ जिवंत काडतुसे, नऊ हजाराची कॅश, एक पिस्तूल, एक स्मार्ट वॉचसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक भरत घोणे हे काम पाहत आहेत.