वेगवेगळ्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या तीन आरोपींना अटक
डोबिवली, माहीम, नालासोपारा येथे गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ सप्टेंबर २०२५
मुंबई, – वेगवेगळ्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी डोबिवली, माहीम आणि नालासोपारा येथून अटक केली. गणेश गोविंद नंदमेहेर, अब्दुल माजिद हनीफ शेख आणि राजू रामा यादव अशी या तिघांची नावे आहेत. यातील गणेश हा पंधरा, अब्दुल दहा तर राजू सतरा वर्षांपासून वॉण्टेड होता. त्यांच्याविरुद्ध किल्ला कोर्टाने अजामिनपात्र वॉरंटसह जाहीरनामा जारी केला होता. अखेर या तिघांना वेगवेगळ्या परिसरातून फेरअटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गेल्या काही महिन्यांत मुंबई पोलिसांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर पळून गेलेल्या वॉण्टेड आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यात मुंबई पोलिसांना यश प्राप्त झाले होते. तरीही पोलिसांनी इतर आरोपींचा शोध सुरु केला होता. अशाच तीन गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. २०११ रोजी गणेश नंदमेहेर याच्याविरुद्ध गुन्हे शाखेच्या युनिट आठच्या अधिकार्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल होती. याच गुन्ह्यांत नंतर त्याला लोकल कोर्टाने जामिन मंजूर केला होता.
मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध किल्ला कोर्टाने जाहीरनामा जारी करुन त्याच्या अटकेचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानंतर त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. गेल्या पंधरा वर्षांपासून तो फरार होता, त्यामुळे त्याचा पोलिसांनी शोध सुरुच ठेवला होात. याच दरम्यान गणेश हा स्वत अस्तित्व लपवून डोंबिवली परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून गणेश नंदमेहेर याला सतरा वर्षांनंतर फेरअटक केली.
दुसर्या कारवाई वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी गेल्या दहा वर्षापासून वॉण्टेड असलेल्या अब्दुल माजिद शेख याला फेरअटक केली. २०१६ साली त्याच्याविरुद्ध गुन्हे शाखेने १८२, १२० बी, ३४ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. याच गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध किल्ला कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दहा वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या अब्दुलला माहीम येथून पोलिसांनी अटक केली.
तिसर्या कारवाईत राजू यादवला दहिसर युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी नालासोपारा येथून अटक केली. २००९ साली त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याला किल्ला कोर्टाने जामिन मंजूर केला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तोदेखील पळून गेला होता. गेल्या सतरा वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुगारा देत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी जाहीरनामा जारी केला होता. त्याचा शोध सुरु असताना त्याला नालासोपारा येथून पोलिसांनी अटक केली.
जामिनावर बाहेर आल्यानंतर तिन्ही आरोपी मुंबईबाहेर पळून गेले होते. त्यानंतर ते वेगवेगळ्या परिसरात स्वतचे अस्तित्व बदलून राहत होता. दहा, पंधरा आणि सतरा वर्षांनंतर आता पोलीस पकडणार नाही असे समजून ते मुंबईत पुन्हा आले होते. मात्र त्याच्या नातेवाईक, मित्रांसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर फेंरअटकेची कारवाई केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय थोपटे, धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप येडे-पाटील, प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश माळी, प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, पोलीस निरीक्षक विजय रासकर, पोलीस उपनिरीक्षक दराडे, सहाय्यक फौजदार बाळकृष्ण तिम्हण, पोलीस हवालदार प्रसाद गोरुले, विशांत भिंगारदेवे, अतिग्रे, जोगडे, पोलीस शिपाई अमोल सोनावणे आदी पथकाने केली.