मालकी हक्क नसलेल्या फ्लॅटवर हेव्ही डिपॉझिट घेऊन फसवणुक
२२ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ सप्टेंबर २०२५
मुंबई, – मालकी हक्क नसलेल्या फ्लॅटवर सुमारे २२ लाखांचे हेव्ही डिपॉझिट घेऊन तीन महिलांसह चौघांची एका जोडप्याने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन चौघांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शैनाज रियाजउद्दीन शेख आणि रियाजउद्दीन इस्लामउद्दीन शेख अशी दोघांची नावे असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्याकडून फसवणुक झालेल्या तक्रारदारांनी वांद्रे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
फिरदोस चॉंद आकडे ही महिला वांद्रे येथील न्यू कांतवाडी, रफिक अपार्टमेंटमध्ये राहत असून घरकाम करते. पूर्वी तिचे कुटुंबिय वांद्रे येथील नर्गिस दत्त नगरात राहत होते. ती नवीन घराच्या शोधात होती. यावेळी तिची एका एजंटने शैनाजशी ओळख करुन दिली होती. ती हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट भाड्याने देण्याचे काम करत होती. त्यामुळे तिने तिला हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याची विनंती केली होती. सप्टेंबर २०२५ रोजी तिने रफिक अपार्टमेंटमध्ये तिच्या मालकीचा ३०१ क्रमांकाचा एक फ्लॅट असल्याचे सांगून तिला तोच फ्लॅट सहा लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर देण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे तिने तिला कॅशसहीत ऑनलाईन सहा लाख रुपये दिले होते. या पेमेंटमध्ये त्यांच्यात लिव्ह ऍण्ड लायसन्स करार झाला होता.
तिच्यासह तिची मैत्रिण सुमेरा परवीन शेख हिनेही शैनाज व तिचा पती रियाजउद्दीन यांना रफिक अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक २०८ साठी एक भाडेकरार केला होता. त्यासाठी त्यांनी तिच्याकडून सहा लाख रुपये हेव्ही डिपॉझिट म्हणून घेतली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी या दोघींना फ्लॅटचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा करुनही शैनाज आणि रियाजउद्दीनकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. याच दरम्यान त्यांना या दोघांनी नजराणा कासिम शेख आणि जाफर जावेद अहमद वारसी यांच्याकडून फ्लॅट क्रमांक २०८ साठी हेव्ही डिपॉझिट म्हणून अनुक्रमे चार लाख आणि सहा लाख रुपये घेतले होते. अशा प्रकारे शैनाज आणि रियाजउद्दीन यांनी फिरदोससह इतर तिघांकडून दोन फ्लॅटसाठी २२ लाख रुपये हेव्ही डिपॉझिट म्हणून घेतले होते.
मात्र कोणालाही फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी दोन्ही फ्लॅटची माहिती काढली असता रफिक अपार्टमेंटमधील ३०१ आणि २०८ क्रमांकाचे दोन्ही फ्लॅट त्यांच्या मालकीचे नव्हते. २०८ क्रमांकाचा फ्लॅटचे मालक फैजल इक्बाल शेख होते, तरीही त्यांनी सुनेरा शेख, नजराना कुरेशी आणि जाफर वारसी यांना तो फ्लॅट तिच्या मालकीचा असल्याचे सांगून त्यांच्यासोबत हेव्ही डिपॉझिटवर भाडेकरार करुन त्यांच्यासह फिरदोस आकडे हिची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चौघांनी त्यांच्याकडे हेव्ही डिपॉझिट म्हणून घेतलेल्या सुमारे २२ लाखांची मागणी केली होती. मात्र त्यांनी कोणालाही पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच या चौघांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शैनाज शेख आणि तिचा पती रियाजउद्दीन शेख यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोन्ही आरोपी पती-पत्नीची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.