चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत दोन आजी-माजी मोलकरणीला अटक
३२ लाखांच्या दागिन्यांसह इतर मुद्देमालावर हातसफाई केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२६
मुंबई, – चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत दोन आजी-माजी मोलकरणीला सांताक्रुज व वांद्रे पोलिसांनी अटक केली. मनिषादेवी सोहन मंडल व तनुजाबिबी रिजाउल मंडल अशी या दोघींची नावे असून अटकेनंतर या दोघींनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांचयाकडून चोरीचा सर्व मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
अंबालिका अलोक बॅनर्जी ही महिला तिची वयोवृद्ध आई आणि पार्टनरसोबत सांताक्रुज येथील हसनाबाद लेन, अरिस्टो सफायर अपार्टमेंटमध्ये राहते. ती सध्या एका खाजगी कंपनीत कायदेशीर संचालक म्हणून कामाला आहे. तिच्या आईने तिला लग्नात काही सोन्याचे दागिने दिले होते. ते सर्व दागिने तिने घरातील बेडरुमच्या कपाटात सुरक्षित ठेवले होते. अनेकदा कार्यक्रमांत दागिने घातल्यानंतर ती दागिने पुन्हा कपाटात ठेवत होती. तिची आई वयोवृद्ध व आजारी असल्याने तिच्या देखभाल करण्यासाठी तिने सुष्मिता भरत सिंग हिला केअरटेकर महणून ठेवले होते. जून २०२६ ती नोकरी सोडून गेली होती. त्यापूर्वी तिच्या घरी मनिषादेवी ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत कामाला होती. मात्र नंतर तिने नोकरी सोडून दिली होती.
ऑगस्ट २०२६ रोजी तिला ओनम या सणानिमित्त कार्यक्रम असल्याने बाहेर जायचे होते. त्यामुळे तिने कपाटातीील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला कपाटात तिचे दागिने दिसून आले नाही. तिने सर्वत्र दागिन्यांचा शोध घेतला, मात्र तिला कुठेच सुमारे २२ लाखांचे सोन्याचे दागिने सापडले नाही. त्यात चार सोन्याचे बांगड्या, चार सोन्याचे कानातील बाली, प्रत्येकी एक सोन्याचे पेंडेट,, चैन, अंगठी आदी २१७ ग्रॅम वजनाच्या विविध दागिन्यांचा समावेश होता. फेब्रुवारी २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत ही चोरी झाली होती. तिच्या घरी तिच्या मोलकरणीशिवाय कोणीही येत नव्हते. त्यामुळे कामाला येणार्या तीनपैकी एकीने दागिन्यांची चोरी केल्याचा तिला संशय होता.
या घटनेनंतर तिने सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. अंबालिका बॅनर्जी हिने तिच्याच घरातील मोलकरणीविरुद्ध संशय व्यक्त केला होता. त्यामुळे नोकरी सोडून गेलेल्या प्रत्येक मोलकरणीची पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. या चौकशीत मनिषादेवी ही विसंगत माहिती देत असल्याचे उघडकीस आले होते. चौकशीदरम्यान तिनेच ही चोरी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर तिला चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली.
दुसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार व्यवसायाने वकिल असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वांद्रे परिसरात राहतात. त्यांचा रुम लहान असल्याने त्यांचे आई-वडिल जवळच असलेल्या एका इमारतीमध्ये राहत असून त्यांच्याकडे गेल्या एक वर्षांपासून तनुजा ही तरुणी घरकाम करते. ती त्यांच्या इमारतीमध्येही घरकामासाठी येत असल्याने त्याने तिला त्यांच्या घरी कामासाठी ठेवले होते. ९ सप्टेंबरला त्यांनी त्यांच्या मुलीच्या प्रवेशासाठी दहा लाख रुपये आणले होते. ही रक्कम त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या घरी ठेवली होती.
दुसर्या दिवशी त्यांची बहिण ही रक्कम घेण्यासाठी गेली होती, मात्र तिला तिथे ती कॅश सापडली नाही. तक्रारदार वर्धाला कामानिमित्त गेले असल्याने त्यांच्या बहिणीने फोनवरुन ही माहिती दिली होती. वर्धाहून मुंबईत आल्यानंतर त्यांनी त्यांच्या आई-वडिलांकडे पुन्हा कॅशचा शोध घेतला, मात्र त्यांना कुठेही कॅश सापडली नाही. दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत तनुजा ही त्यांच्याकडे काम करते. त्यांच्या घरी तनुजा वगळता इतर कोणीही येत नव्हते.
ही कॅश तिनेच चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी तनुजाविरुद्ध दहा लाखांची कॅशची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तनुजाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत तिचा सहभाग उघडकीस येताच तिच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती.