मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सातरस्ता येथील अंबिका मोबाईल शॉपमध्ये घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने शॉपमधील शटर तोडून आत प्रवेश करुन सुमारे पावणेपंधरा लाखांचे विविध कंपनीचे ७५ हून अधिक मोबाईलची चोरी करुन पलायन केले. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सतराराम मसरामजी माली हे व्यावसायिक असून काळाचौकी येथील घोडपदेव परिसरात राहतात. त्यांचा अंबिका मोबाईल नावाचे एक शॉप सातरस्ता येथील साने गुरुजी मार्ग, झव्हेरी इमारतीमध्ये आहे. या शॉपमध्ये मोाबाईल विक्रीसह रिपेरिंगचे काम चालते. या व्यवसायात त्यांचा लहान भाऊ रेवाराम पार्टनर म्हणून काम करतो. २९ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता ते नेहमीप्रमाणे दुकानात आले होते. दिवसभर काम करुन रात्री दहा वाजता ते दुकान बंद करुन ते घरी गेले होते.
पहाटे साडेतीन वाजता त्यांना जाग आली, त्यामुळै त्यांनी त्यांच्या मोबाईलमधील दुकानाचे सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात त्यांना दुकानाचे सीसीटिव्ही फुटेज बंद असल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या परिचित मित्र आणि दूधाचा व्यवसाय करणारे सुरेशभाई यांना कॉल केला होता. त्यांना दुकानाजवळ जाऊन पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे सुरेशभाई तिथे गेले होते. यावेळी त्यांना सीसीटिव्ही कॅमेर्याला अज्ञात व्यक्तीने कपड्याने झाकल्याचे दिसून आले. त्यामुळे सतराराम हे त्यांचा भाऊ दलाराम यांच्यासोबत दुकानात आले होते.
यावेळी त्यांना अंबिका मोबाईल शॉपचे शटर तुटलेले आणि आतमध्ये पाहणी केल्यानंतर अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरी केल्याचे दिसून आले. या मोबाईलची पाहणी केल्यानंतर या व्यक्तीने दुकानातील ७५ हून अधिक १४ लाख ७२ हजाराचे विवो, रियल मी, एमआय, मोटोरोला, ओपो, सॅमसंग, लावा आदी कंपनीचे मोबाईल चोरी करुन पलायन केल्याचे निदर्शनास आले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आग्रीपाडा पोलिसांना ही माहिती दिली होती.
या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सतराराम माली यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.