वर्सोवा समुद्रकिनार्‍यावर सापडलेल्या अज्ञात व्यक्तीचा हत्येचा पर्दाफाश

हत्येप्रकरणी मुख्य आरोपी उत्तरप्रदेशातून अटक तर चौघांचा शोध सुरु

0

अरुण सावरटकर
१० ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – दहा दिवसांपूर्वी अंधेरीतील वर्सोवा, हिंदू स्मशानभूमीमागील समुद्रात गोणीत सापडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात वर्सोवा पोलिसांना यश आले आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव बसंतलाल होरीलाल रायदास (३८) असून त्याच्या हत्येप्रकरणी त्याचाच मालक जुगराज रामनाथ यादव याला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत जुगराजच्या अल्पवयीन मुलासह दोन मुले दोन कर्मचारी आणि एका महिलेचा सहभाग उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलाला नोटीस देऊन त्याच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आले तर इतर चौघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. मृत आणि सर्व आरोपी उत्तरप्रदेशच्या फतेहपूर, जनपथचे रहिवाशी असून हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही.

दिपक भास्कर निकाळजे हे वर्सोवा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. १ ऑक्टोंबरला ते दिवसपाळीवर कर्तव्यावर हजर झाले होते. सकाळी पावणेनऊ वाजता एका दक्ष नागरिकाने मुंबई पोलिसांच्या कट्रोल रुमला कॉल करुन अंधेरीतील वर्सोवा, हिंदू स्मशानभूमीमागील समुद्रकिनार्‍यावर एका गोणीत काहीतरी संशयास्पद असल्याची माहिती दिली होती. ही माहिती कंट्रोल रुममधून प्राप्त होताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना त्या गोणीत एका ३५ ते ४० वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह गोणीत भरुन नंतर ती गोणी शिवून बंद करण्यात आली होती.

ही गोणी नंतर समुद्रात फेंकून अज्ञात व्यक्तीने हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. घटनास्थळाचा पंचनामा करुन तो मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. प्राथमिक तपासात या व्यक्तीची गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे दिपक निकाळजे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती, त्याची ओळख पटेल अशी कुठलीही वस्तू सापडली नाही. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते.

मृतदेहाच्या उजव्या हातावर बसंतलाल, हाताच्या बोटाच्या मागील बाजूस ओम आणि मॉ असे गोंदलेले होते. त्यामुळे या अक्षरावरुन त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. सोशल मिडीयावर संबंधित व्यक्तीची माहिती अपलोड करुन त्याच्याविषयी जास्तीत जास्त माहिती काढण्याचे काम सुरु होते. ही माहिती काढत असताना मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या गोणीचा वापर झाला होता, ती गोणी मालाड येथील अजय ट्रेडर्स दुकानातील असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे तिथे जाऊन पोलिसांनी मृत व्यक्तीविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात मृत व्यक्ती लिबर्टी गार्डनच्या ओम आशिष सहकारी सोसायटीमध्ये असलेल्या अजय ट्रेडर्स या कांदा-बटाटा दुकानात काम करणारा कर्मचारी तसेच त्याचे नाव बसंतलाल रायदास असल्याचे समजले होते.

मात्र ते दुकान बंद होते, दुकानाचा मालक त्याच्या उत्तरप्रदेशातील गावी गेला होता. त्याच्याशी पोलिसांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. दुकानात काम करणारे दोन ते तीन कर्मचारीही अचानक त्यांच्या गावी निघून गेले होते. त्यामुळे वर्सोवा पोलिसांच्या टिमला उत्तरप्रदेशातील फतेहपूर येथे पाठविण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या अजय ट्रेडर्स दुकानाचे मालक जुगराज यादवला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने बसंतलाल याची हत्या केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांत त्याला त्याच्या दोन मुलांसह कर्मचारी आणि एका महिलेने मदत केली होती.

मृतदेहाची विल्हेटवाट लावून ते सर्वजण मुंबईतून उत्तरप्रदेशात पळून गेले होते. या कबुलीनंतर त्याला कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ८ ऑक्टोंबरला हत्येच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला दुसर्‍या दिवशी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला रविवार ११ ऑक्टोंबरपर्यंत ट्रॉन्झिंट रिमांड दिले होते. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. या गुन्ह्यांत त्याच्या पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याला ताब्यात घेणयात आले होते. त्याला नोटीस देऊन त्याच्या नातेवाईकांना सोपविण्यात आले. या नातेवाईकांना आरोपी मुलाला वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

प्राथमिक तपासात जुगराजने त्याचा अल्पवयीन मुलगा, अनिल जुगराज यादव, संतोष मिश्रा, शिवम मिश्रा व अन्य एका महिलेच्या मदतीने बसंतलालची हत्या करुन त्याचा मृतदेह एका वाहनाने वर्सोवा येथे आणून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या गुन्ह्यांत निल यादव, संतोष मिश्रा, शिवम मिश्रा आणि अन्य एका महिलेला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटकेनंतर जुगराज यादवला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या हत्येमागील कारणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page