१.१९ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी मांत्रिक असलेल्या बिल्डरला अटक
व्यवसायात गुंतवणुकीसह अघोरी पूजेसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार केला
अरुण सावरटकर
८ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून व्यवसायात गुतवणुकीसाठी घेतलेल्या एक कोटी एकोणीस लाखांचा अपहार करुन एका मायलेकींची फसवणुक करुन पळून गेलेल्या वॉण्टेड बिल्डरला समतानगर पोलिसांनी अटक केली. मोहम्मद एहसान जानमोहम्मद शेख असे या बिल्डरचे नाव असून त्याची फाऊंटन रियल इस्टेट कंपनी आहे. बिल्डरसोबत तो मांत्रिक म्हणून काम करुन लोकांच्या घरी अघोरी पूजा करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुंतवणुकीच्या आमिषासह पूजेच्या नावाने त्याने आतापर्यंत अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जाते.
ऐश्वर्या सुधीर जोहरी ही तरुणी तिची आई ममतासोबत कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात राहत असून ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिच्या वडिलांचे २०१४ साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांनी सेव्हिंग केलेले सुमारे पन्नास लाख तिला मिळाले होते. ही रक्कम तिने तिच्या बँक खात्यासह म्युच्युअल फंडात गुंतवणुक केली होती. सात वर्षांपूर्वी तिच्या आईच्या मैत्रिणीच्या माध्यमातून त्यांची मोहम्मद एहसान शेखशी ओळख झाली होती. तिने तिला एहसानने तिच्या घरातील वाईट शक्ती, आत्म्यांचा प्रभाव दूर करण्यासाठी मदत केल्याची माहिती दिली होती. त्यामुळे तिने त्याची भेट घेतली होती.
या भेटीदरम्यान त्याने अंधश्रद्धेशी संबंधित कार्यासोबत त्याची फाऊंटन रियल इस्टेट नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित असून त्याच्या मालकीचे अनेक प्लॉट आहेत. तिथे इमारती बांधून तो फ्लॅटची विक्री करतो. त्यात तिने पैसे गुंतवणुक केल्यास तिला चांगला परतावा मिळेल असे सांगितले. त्यामुळे ममताने त्याच्या कंपनीत गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे जुलै २०१९ ते एप्रिल २०२१ या कालावधीत त्याच्या कंपनीत ममता जोहरीने ४३ लाख तर ऐश्वर्या जोहरीने ऑनलाईन आणि कॅश स्वरुपात ७२ लाखांची गुंतवणुक केली होती. अशा प्रकारे या मायलेकींनी चांगल्या परताव्याच्या आमिषाने एहसानला १ कोटी १५ लाख रुपये दिले होते. याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता.
या दोघींनी गुंतवणुक केलेल्या पैशांतून त्याने पुण्यातील जुन्नर, नारायणगाव बाजार परिसरात ४१ लाखांमध्ये २० गुंटे जमिन खरेदी केली असून या जमिनीवर बांधकाम करुन त्यांना पंधरा महिन्यांत तीस लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. याच दरम्यान एहसानने त्यांच्याकडून पाच लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन ते दागिने एका बंद पेठीमध्ये ठेवून अघोरी पूजा केली होती. तसेच सांगितल्याशिवाय ती पेठी उघडू नका असे सांगितले होते. मात्र हा प्रकार ऐश्वर्या संशयास्पद वाटला होता. त्यामुळे एहसानने सांगूनही ती पेठी उघडून पाहिली होती. त्यात तिला दागिने नसल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तिला ते सर्व दागिने जमिनीच्या व्यवहारात गुंतवणुक केल्याचे सांगितले. या प्रकारानंतर त्यांनी त्याच्याकडे जमिनीच्या व्यवहारासाठी गुंतवणुक रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.
जानेवारी २०२३ साली त्याने त्यांच्यासोबत नव्याने करार करुन जानेवारी २०२४ पर्यंत सर्व रक्कम व्याजासहीत देण्याचे मान्य केले होते. मात्र एक वर्ष उलटूनही त्याने पैसे परत केले नाही. नारायण सिटीजवळ इमारतीचे बांधकाम सुरु असून फ्लॅटच्या विक्रीतून १ कोटी ४० लाख रुपये परत करण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे त्याने त्यांना पैसे परत केले नाही. चौकशीदरम्यान नारायण सिटीत कुठलेही बांधकाम सुरु नसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. चांगला परतावा देतो, अघोरी पूजेसाठी त्याने मायलेकीकडून टप्याटप्याने एक कोटी एकोणीस लाख रुपये घेतले, मात्र कुठलाही परतावा न देता त्यांची फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच ऐश्वर्याने त्याच्याविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मोहम्मद एहसान शेख याच्याविरुद्ध गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन तक्रारदार मायलेकींची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम असताना गेल्या आठवड्यात त्याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करणयत आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद एहसानने गुंतवणुकीवर चांगला परताव्याचे आमिष दाखवून इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.