बेकायदेशीर सीडीआर-एसडीआर पुरविणार्या टोळीचा पर्दाफाश
पाच आरोपींना अटक तर दोन आरोपी पोलीस असल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – चोरीसह गहाळ झालेले मोबाईल शोधून देतो अशी जाहिरात काढून बेकायदेशीरपणे मोबाईलचे सीडीआर, एसडीआर तसेच लोकेशन पुरविणार्या एका आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत पोलिसांनी मुंबईसह बिहार, झारखंड आणि मध्यप्रदेशातून पाच आरोपींना अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांचे सीडीआर, एसडीआर आणि लोकेशन काढून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याकामी त्यांना बिहार आणि झारखंड पोलीस दलात कार्यरत असलेल्या पंकजकुमार गोखतार शुक्ला आणि प्रिंसकुमार प्रविण सहानी या दोन पोलीस शिपायांनी मदत केली होती. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून दोन्ही आरोपी पोलीस शिपायांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्ंयांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंधेरीतील ओशिवरा परिसरात राहणार्या एक व्यक्तीने तो कुठल्याही शासकीय पदावर काम करत नसताना चोरीसह गहाळ मोबाईल फोन हस्तगत करुन देतो अशी इंटाग्रामवर जाहिरात केली होती. ही जाहिरात सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाली होती. त्याची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप येडे-पाटील व त्यांच्या पथकाने आरोपींची माहिती काढून त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश मदने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप येडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, पूजा खांडेकर, विजय रासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर मुजावर, युवराज चव्हाण, कैलास सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक किरण कोते, अजय सावंत, सहाय्यक फौजदार सुनिल चव्हाण, बाळकृष्ण लिम्हण, संतोष राणे, कल्पेश सावंत, पोलीस हवालदार संतोष बने, प्रसाद गोरुले, विजय पवार, महिला पोलीस हवालदार समृद्धी गोसावी, हश्चिंद्र भोसले, अर्पिता पडवळ, पोलीस शिपाई चंद्रकांत शिरसाठ, स्वप्नील चंदनशिवे आदी पथकाने जोगेश्वरीतील एस. व्ही. रोड, एचपी पेट्रोलपंपासमोरील आयेशा टॉवर प्रवेश गेटजवळ सापळा लावून हंजला मुबारक सय्यद याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत हंजलाकडून त्याच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली होती. त्यानंतर या पथकाने मध्यप्रदेश, बिहार आणि झारखंड येथून गौरव निर्मेशकुमार परिहार, अमीतकुमार सचेंद्रदेव तिवारी, आझादकुमार धर्मेद्रराम पासवान, कृष्णकुमार कौशलकुमार गौतम आणि संजीवकुमार लहवरप्रसाद गुप्ता या आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत ते सर्वजण कुठल्याही शासकीय पदावर कामाला नव्हते. तरीही त्यांनी चोरीसह गहाळ झालेले मोबाईल शोधून देतो, सीडीआर, एसडीआर आणि लोकेशन काढतो असे अशी जाहिरात करुन अनेकांना संपर्क साधला होता. स्वतला ते पोलीस निरीक्षक संजय असे सांगत होते.
त्यांच्याकडून चोरीसह गहाळ झालेले मोबाईल शोधून काढण्यासाठी तसेच सीडीआर व डीएसडीआरसाठी पैसे घेत होते. या सर्व आरोपींविरुद्ध नंतर भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांत दोन पोलिसांचा सहभाग उघडकीस आला होता. ते दोघेही झारखंड आणि बिहार पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. झारखंड धनबादचा पोलीस पंकजकुमार गोखतार शुक्ला आणि बिहारच्या वैशालीचा पोलीस प्रिंसकुमार प्रविण सहानी अशी या दोघांची नावे आहेत.
या दोघांच्या मदतीने इतर आरोपींनी आतापर्यंत ५० सीडीआर, ५२० पेक्षा एसडीआर, ५५० पेक्षा जास्त मोबाईलचे लोकेशन काढले होते. तसेच ४२० हून अधिक आयएमईआय क्रमांकाची माहिती पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून सात मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे. अटकेनंतर या सर्व आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत दोन्ही पोलिसांची चौकशी सुरु असून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप येडे-पाटील यांनी दुजोरा दिला आहे.