७७ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड व्यावसायिकाला अटक

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने वयोवृद्धाची फसवणुक केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देतो असे सांगून एका ७७ वर्षीय वयोवृद्धाची ७७ लाखांची फसवणुक केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या एका मुख्य आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. जय मुकेश मेहता असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जय हा फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यातील बहतांश फसवणुकीच्या गुन्ह्यांत त्याच्यावर अटकेची कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिनेशचंद्र न्यायचंद भरवाडा हे व्यावसायिक असून ते बोरिवलीतील चंदावरकर रोडवरील एका पॉश अपार्टमेंटमध्ये राहतात. दोन वर्षांपूर्वी मिरारोडचा रहिवाशी असलेला जयसोबत त्यांची ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्याने त्याचा शेअरमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय असल्याचे सांगितले होते. शेअरमध्ये त्याने अनेकांचे पैसे गुंतवणुक केले असून त्यांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांनीही शेअरमध्ये गुंतवणुक करावी. त्यांचा वार्षिक दहा टक्के फायदा मिळवून देतो असे सांगून त्याने त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. जय हा त्यांच्या परिचित तसेच चांगला मित्र झाल्याने त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्याला शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी एक कोटी रुपये दिले होते.

या गुंतवणुकीनंतर त्याने त्यांना २२ लाख ५५ हजार रुपये व्याज म्हणून दिले होते. मात्र नंतर त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. विचारणा केल्यानंतर जय मेहता त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने जयने एक कोटी रुपये घेऊन त्यांना २२ लाख ५५ हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित ७७ लाख ४५ हजाराचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर जय मेहताविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. तपासात जय मेहता फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले होते. त्याच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक अपहारासह फसवणुकीचे गुन्हे दाखल होते. अखेर वॉण्टेड असलेल्या जय मेहताला नंतर पोलिसांनी अटक केली होती. त्याचा वेगवेगळ्या गुन्ह्यांत संबंधित पोलिसांनी ताबा घेतला होता. अखेर दोन वर्षांनी त्याला शेअर गुंतवणुकीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बुधवारी बोरिवलील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page