टायगरच्या कारवर गोळीबार करणारे शूटर पंधरा तासांत गजाआड
तिन्ही शूटरची नेपाळला पळून जाण्याची योजना फसली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – फुटबॉल सामन्यानंतर घरी जाणार्या सिनेअभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर अंधाधुंद गोळीबार करणार्या तिन्ही शूटरला अवघ्या पंधरा तासांत मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने शिताफीने गजाआड केले. त्यापैकी एक शूटर अल्पवयीन असल्याचे बोलले जाते तर दोघांमध्ये रेहान ऊर्फ सुक्का रहिमसुद्दीन आणि ऋतिक कुर्मी ऊर्फ रोशन फायटर रामू महतो यांचा समावेश आहे. या तिघांना ट्रॉन्झिंट रिमांड देण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत त्यांना पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात येणार आहे. या तिघांना नंतर किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गोळीबारानंतर ते तिघेही नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते, मात्र त्यांना कोटा रेल्वे स्थानकात पोलिसांनी अटक केली.
टायगर श्रॉफ हा रविवारी सायंकाळी जुहू येथे फुटबॉल सामन्यासाठी आला होता. सामना संपल्यानंतर तो त्याच्या चालकासोबत घरी जाण्यासाठी निघाला. जुहूच्या पुष्पा पार्कजवळून त्याची कार जात असताना बाईकवरुन आलेल्या तीन अज्ञात व्यक्तीने त्याच्या कारच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबारात त्याचा कारचालक आणि एक व्यक्ती जखमी झाला होता. गोळीबारात टायगर श्रॉफ हा थोडक्यात बचावला होता. टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्नपासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. तपास हाती येताच गुन्हे शाखेच्या वीसहून अधिक पथकाने आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना ते तिघेही मुंबईहून सुरत आणि नंतर राजस्थानच्या दिशेने पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
ही माहिती नंतर राजस्थान पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलीस अधिक्षक तेजस्विनी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली थाना रेल्वे कॉलनीतील पोलीस निरीक्षक रामस्वरुप मिणा, मदनलाल कानी अजीत कानी, राजेंद्र कानी, जितेंद्र कानी, ओमप्रकाश कानी, थाना भीमगंजामडीचे पोलीस निरीक्षक रामविलास मिना, कृष्णगोपाल मीणा, लोकेश कानी, मोहितकुमार कानी, अंबाराम कानी, प्रेमकुमार कानी, जिल्हा विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक् लईक अहमद, बहादूर सिंह, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र सिंह, अशोक सिंह, पोलीस हवालदार महेंद्र सिंह, संजश शर्मा, परमेश्वर कानी, प्रदीप शर्मा, शौकत खान, जयवीर कानी, इरफान कानी, मामराज कानी, दिनेश कानी, देवेंद्र कानी, , प्रदुमन कानी, सायबर सेलचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय सिंह, सुरेश हैडकानी, इंद्रसिंह कानी, सुनील चंदेल, शैलेंद्र कानी, एजीटीएफचे पोलीस उपनिरीक्षक् प्रताप सिंह, आरपीएफ कोटाचे पोलीस निरीक्षक चोपसिंह डाबर, पोलीस उपनिरीक्षक सुमीत रघुवंशी, कप्तान सिंह आदी पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना तिन्ही शूटरला कोटा रेल्वे स्थानकातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. या तिघांच्या चौकशीत त्यांनीच टायगर श्रॉफच्या कारवर अंधाधुंद गोळीबार केल्याची कबुली दिली. ही माहिती नंतर मुंबई पोलिसांना देण्यात आली होती. गोळीबारानंतर अवघ्या पंधरा तासांत तिन्ही शूटर गजाआड झाले होते. काही वेळानंतर गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तिथे रवाना झाले होते. या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करुन त्यांची ट्रॉन्झिंट रिमांड घेण्यात आली. कोर्टाने ट्रॉन्झिंट रिमांड मंजूर करताच या तिघांचा ताबा मुंबई पोलिसांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर त्यांना घेऊन पोलीस पथक मुंबईकडे रवाना झाले होते. रात्री उशिरापर्यंत तिन्ही आरोपींना मुंबईत आणले जाणार आणि नंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई-सुरतमार्गे राजस्थानला पलायन
जुहू येथे गोळीबार करुन तिन्ही आरोपी बाईकवरुन पळून गेले होते. जुहू येथून अंधैरी रेल्वे स्थानकात येताच त्यांनी तिथेच बाईक सोडून पलायन केले. अंधेरी रेल्वे स्थानकातून कांदिवली रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्यांनी एक कॅब बुक केली होती. कॅबने रोडमार्गे ते तिघेही सुरतला आले. तिथे काही वेळ थांबून त्यांनी जेवण घेतले होते. त्यानंतर ते तिघेही पुण्याहून सुटणार्या पुणे-जयपूर एक्सप्रेसने राजस्थानला जाण्यासाठी निघाले. तोपर्यंत सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन त्यांची माहिती मुंबई पोलिसांना प्राप्त झाली होती. ते तिघेही जयपूर एक्सप्रेसने प्रवास करत असल्याची माहिती राजस्थान पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर या पोलीस पथकाने कोटा रेल्वे स्थानकात या तिघांनाही ताब्यात घेतले. जयपूरहून ते तिघेही दिल्ली आणि नंतर नेपाळला पळून जाणार होते. तसे आदेशख त्यांना देण्यात आले होते, मात्र नेपाळला पळून जाण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली.
शूटरने वापरलेल्या बाईकचे तीन मालक
शूटरने गोळीबारासाठी एका बाईकचा वापर केला होता. ही बाईक जोगेश्वरी परिसरात राहणार्या एका व्यक्तीच्या मालकीची आहे. त्याने ती बाईक दुसर्याला तर दुसर्याने तीच बाईक तिसर्या व्वक्तीला विक्री केली होती. या व्यक्तीने ती बाईक शूटरला दिली होती. त्याचे संपूर्ण पेमेंट शूटरने संबंधित व्यक्तीला दिले होते. बाईकचे कागदपत्रे नावावर करण्यासाठी त्यांनी नवरात्रोत्सावानंतर ठरविले होते. ही बाईक अंधेरी रेल्वे स्थानकात सापडली, ती नंतर डी. एन नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आली. तिथेच बाईक मालकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. याच चौकशीतून तिन्ही शूटरची माहिती सर्वप्रथम पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला, शूटरच्या मागेच गुन्हे शाखेचे एक पथक मुंबईहून सुरत आणि नंतर कोटा रेल्वे स्थानकापर्यंत गेले होते.
तिन्ही आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होणार
तिन्ही आरोपी बिष्णोई टोळीशी संबंधित आहे. ते तिघेही बिष्णेईचा खास सहकारी अनिल पंडीतच्या संपर्कात होते. त्याच्याच सांगण्यावरुन त्यांनी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला होता. गोळीबारानंतर त्यांना नेपाळला पळून जाण्यास सांगण्या आले हाते. त्यामुळे गोळीबारानंतर ते मुंबईहून नेपाळला जाण्यासाठी निघाले. त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे गुन्ह्यांत पिस्तूल, रिव्हॉल्व्हर सापडले नाही. वाटेतच त्यांनी गुन्ह्यांतील घातक शस्त्रांची विल्हेवाट लावली होती. या तिघांना मुंबईत आणल्यानंतर त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होणार आहे. प्राथमिक तपासात टायगर श्रॉफ हा रविवारी सायंकाळी जुहू येथे जाणार आहे ही टिप शूटरला आधीच होती, त्यामुळे त्यांना ती टिप कोणी दिली होती याचाही पोलीस तपास करत आहेत. दुसरीकडे गोळीबारानंतर टायगर श्रॉफसह इतरांची जबानी नोंदविण्याचे काम सुरु आहे. या जबानीत टायगर श्रॉफला बिष्णोई टोळीकडून कुठलीही धमकी आली नव्हती. मात्र रविवारी झालेल्या गोळीबारानंतर टायगर श्रॉफला मुंबई पोलिसांकडून पोलीस संरक्षण पुरविले जाणार आहे.
