गरबा खेळण्यासाठी गेली म्हणून पत्नीच्या पोटात चाकूने भोसकले

हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत पतीला अटक व पोलीस कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – गरबा खेळण्यासाठी गेली म्हणून रागाच्या भरात पतीने पत्नीच्या पोटात चाकूने भोसकल्याची घटना पवई परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात वैशाली महेश रजत ही ३० वर्षांची महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार ुसरु आहे. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन आरोपी पती महेश सुभाष रजत याला अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजता पवईतील आयआयटी, महात्मा फुले नगर, समता मित्र मंडळासमोरील रस्त्यावर घडली. याच परिसरात वैशाली ही राहत असून ती पेशंट साभाळण्याचे काम करते. महेश हा तिचा पती असून तो गोरेगाव येथील एका कॅण्टीनमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतो. या दोघांना नऊ आणि पाच वर्षांचे दोन मुले आहेत. महेशला दारु पिण्याचे व्यसन होते. त्यातून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन अनेकदा खटके उडत होते. शनिवारी वैशाली ही परिसरात आयोजित करण्यात आलेला गरबा खेळण्यासाठी जात होती. यावेळी महेशने तिला गरबा खेळण्यासाठी जाऊ नकोस असे सांगितले.

मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याने मद्यप्राशन केले होते, त्यामुळे तिने बारापर्यंत घरी येत असे सांगून ती रात्री दहा वाजता गरबा खेळण्यासाठी निघून गेली. रात्री साडेअकरा वाजता ती गरबा खेळत असताना तिथे महेश आला. त्याने तिला घरी येण्यास सांगितले. त्यामुळे ती त्याच्यासोबत घरी जाण्यासाठी निघाली. वाटेच त्याने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिने रस्त्यावर शिवीगाळ करु नकोस, तू सध्या शुद्धी नाही. घरी गेल्यानंतर आपण बोले असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने कमरेला लावलेला चाकू काएून तिच्या पोटात भोसकले. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली.

हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी वैशालीला तातडीने जवळच्या महात्मा फुले हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक औषधोपचार करुन तिला पुढील उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. ही माहिती प्राप्त होताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी वैशालीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा पती महेश रजतविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या महेशला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page